महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 06:40 IST2026-04-28T06:39:24+5:302026-04-28T06:40:06+5:30
५५ कोटींचा खर्च अपेक्षित, राज्यातील सर्वाधिक रस्ते हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असल्याने त्यांच्या अभिप्रायानंतर हा प्रस्ताव पुन्हा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
महेश कोले
मुंबई : राज्यभरातील महामार्गांवर अनेक ठिकाणी धोकादायक वळणे, मार्गदर्शक फलक नसल्यामुळे भीषण अपघात घडतात. चुकीच्या ठिकाणी फलक लावण्यात आलेल्या असंख्य तक्रारीही आहेत. या पार्श्वभूमीवर आता ३० हजार किमी महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी आयआयटी रुरकी या प्रतिष्ठित संस्थेची नेमणूक करण्याचा प्रस्ताव परिवहन विभागाने शासनाला पाठवला असून संपूर्ण प्रकल्पाचा अंदाजित खर्च ५५ कोटी असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
अनेक महामार्गांवर वेगमर्यादा दर्शविणारी चिन्हे, वळणांची पूर्वसूचना, धोकादायक ठिकाणांचे संकेत, तसेच मार्गदर्शक फलक अपुरे किंवा चुकीच्या ठिकाणी असल्याच्या तक्रारी आहेत. तज्ज्ञांच्या मते, मानकांनुसार बसवलेली वाहतूक चिन्हे अपघात टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना ठरेल.
बांधकाम विभागाचा अभिप्राय घेणार
राज्यातील सर्वाधिक रस्ते हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असल्याने त्यांच्या अभिप्रायानंतर हा प्रस्ताव पुन्हा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित विभागांकडून तांत्रिक व आर्थिक बाबींचा आढावा घेतल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. हा प्रस्ताव मंजूर झाला, तर महामार्गांवरील वाहतूक सुरक्षित होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अचूक वाहतूक व्यवस्थापन होऊन अपघात घटणार
परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, “रोड सायनेज ऑडिटमुळे वाहतूक व्यवस्थापन अचूक होईल तसेच अपघातांचे प्रमाणही लक्षणीयरीत्या घटू शकते. वाहतूक चिन्हे दीर्घकालीन शाबूत राहावे, यासाठी त्याचे ऑडिट आणि गुणवत्ता सुधारणे आवश्यक असल्याने हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
काय असेल स्वरूप?
विद्यमान वाहतूक चिन्हे अचूक ठिकाणी दर्शविण्यात येतील.
वेगमर्यादा फलकांची गरज आणि स्थान
अपघातप्रवण (ब्लॅक स्पॉट) भाग शोधून कार्यवाही करता येईल.
रात्रीच्या वेळी दृश्यमानतेसाठी रिफ्लेक्टिव्ह सायनेजची सुविधा
आंतरराष्ट्रीय मानकांनुसार वाहतूक व्यवस्थापनात सुधारणा