‘ ...तर माझी जीभ नक्की कापा’, हर्षवर्धन सपकाळ यांचं भाजपाला थेट आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 13:09 IST2026-02-16T13:07:39+5:302026-02-16T13:09:20+5:30

Harshvardhan Sapkal News: भाजपाचे अहिल्यानगरमधील शहराध्यक्ष अनिल मोहिते यांनी थेट हर्षवर्धन सपकाळ यांची जीभ छाटा, १० लाख रुपये देतो, असं विधान केलं होतं. त्याला प्रत्युत्तर देत सपकाळ यांनी भाजपाला थेट आव्हान दिलं आहे.

'...then definitely cut my tongue', Harshvardhan Sapkal's challenge to BJP | ‘ ...तर माझी जीभ नक्की कापा’, हर्षवर्धन सपकाळ यांचं भाजपाला थेट आव्हान

‘ ...तर माझी जीभ नक्की कापा’, हर्षवर्धन सपकाळ यांचं भाजपाला थेट आव्हान

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान हा छत्रपती शिवाजी महाराज यांना समकक्ष असल्याच्या केलेल्या विधानावरून सध्या मोठा वाद उफाळून आला आहे. तसेच  सत्ताधारी भाजपाने सपकाळ यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. सपकाळ यांच्या या विधानाविरोधात भाजपाकडून तीव्र आंदोलनं केली जात आहेत. यादरम्यान, सपकाळ यांची जीभ छाटण्याचंही आवाहन भाजपा नेत्यांनी केलं होतं, त्याला प्रत्युत्तर देताना सपकाळ यांनी थेट भाजपालाच आव्हान दिलं आहे.

भाजपाचे अहिल्यानगरमधील शहराध्यक्ष अनिल मोहिते यांनी थेट हर्षवर्धन सपकाळ यांची जीभ छाटा, १० लाख रुपये देतो, असं विधान केलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, माझी जीभ कापल्यानंतर जर भारतीय शेतकऱ्यांचे अमेरिकेतून होणाऱ्या  आयातीपासून संरक्षण होणार असेल, ही अन्यायकारक ट्रेड-डील रद्द होऊन शेतमालाला भाव मिळणार असतील, शेतकरी कर्जमुक्त होणार असेल, भाजप हिंदू-मुस्लिम द्वेषाला खतपाणी घालणार नसेल, चीनने बळकावलेला भूभाग परत मिळणार असेल तर माझी जीभ नक्की कापा.
सपकाळ यांनी पुढे लिहिले की,  अदानी-अंबानी आणि अमेरिकेचे भले करणाऱ्या, संविधान बदलू पाहणाऱ्या भाजपला मी एक्सपोज करतो म्हणून त्यांना माझी जीभ कापायची असेल. तर जीभ खुशाल कापा, पण मी थांबणार नाही, असं आव्हानही सपकाळ यांनी यावेळी दिलं.

दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान याच्या मालेगाव महानगरपालिकेमध्ये लावण्यात आलेल्या फोटोचं समर्थन करताना टिपू सुलतान हा छत्रपती शिवाजी महाराज यांना समकक्ष असल्याचं विधान केलं होतं. हर्षवर्धन सपकाळ यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठा वाद उफाळून आला आहे. 

Web Title: '...then definitely cut my tongue', Harshvardhan Sapkal's challenge to BJP