मुलीसाठी पाच लाखांत पेपर विकत घेतला? सीबीआयकडून नांदेडात पालकांची चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 06:15 IST2026-05-17T06:15:40+5:302026-05-17T06:15:58+5:30
NEET Paper Leak Case: नांदेडमध्ये सीबीआयची ८ तास चौकशी. अश्विनी भाऊराव कदम यांच्या घरावर छापा. १०० गुण मिळवणाऱ्या विद्यार्थिनीला मिळाले ५६० गुण. वाचा सविस्तर वृत्त.

मुलीसाठी पाच लाखांत पेपर विकत घेतला? सीबीआयकडून नांदेडात पालकांची चौकशी
नांदेड : पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता नांदेडपर्यंत पोहोचले असून शनिवारी सीबीआयच्या पथकाने नांदेडातील विद्युतनगर भागात धडक कारवाई केली. येथील कदम कुटुंबीयांच्या निवासस्थानी तब्बल आठ तासांपेक्षा जास्त वेळ कसून चौकशी आणि झाडाझडती घेण्यात आली. मुलीसाठी पाच लाख रुपयांत नीटचा पेपर खरेदी केल्याचा खळबळजनक आरोप या कुटुंबावर आहे. लातूरमध्ये शुक्रवारी एका कोचिंग क्लास चालकाची चौकशी केल्यानंतर सीबीआयचे हे पथक थेट नांदेडात दाखल झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयच्या पथकाने शनिवारी सकाळीच विद्युतनगर भागातील अश्विनी भाऊराव कदम यांच्या फ्लॅटवर छापा टाकला. या पथकाने सकाळपासूनच घरातील सर्व महत्त्वाच्या कागदपत्रांची बारकाईने तपासणी केली. कदम यांनी आपल्या मुलीसाठी पाच लाख रुपये देऊन नीटचा पेपर विकत घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
पुरावे नष्ट करण्यासाठी फोन?
नीट पेपरफुटी प्रकरणात काही आरोपींना अटक झाल्यानंतर, कदम यांना नागपूर येथून एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला होता. “पेपर संदर्भातील सर्व कागदपत्रे तातडीने जाळून टाका,” असा सल्ला या फोनवरून देण्यात आला होता.
मुलीला ५६० गुण कसे मिळाले?
नांदेडमध्ये तयारी करीत असताना सदर विद्यार्थिनीला केवळ १०० ते १२० गुण मिळत होते. त्यानंतर झालेल्या नीट परीक्षेत तिचा स्कोअर ५६० येऊ लागला. हे ऐकून नातेवाईक आणि तिचा मित्र परिवारही अवाक् झाला होता.