साक्रीत दुहेरी हत्याकांड; भोंदू बाबा गजाआड, अघोरी पूजेतून वाद झाल्याने हत्या करून मृतदेह पुरले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 05:57 IST2026-05-17T05:57:26+5:302026-05-17T05:57:57+5:30
शिरपूर येथील दुहेरी हत्याकांडाची घटना ताजी असतानाच २४ तासांत ही दुसरी घटना समोर आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

साक्रीत दुहेरी हत्याकांड; भोंदू बाबा गजाआड, अघोरी पूजेतून वाद झाल्याने हत्या करून मृतदेह पुरले
लोकमत न्यूज नेटवर्क
जैताणे (जि. धुळे) : साक्री तालुक्यातील वर्धाने व उभरांडी शिवारात एका महिलेसह तरुणाचा मृतदेह आढळून आला. शिरपूर येथील दुहेरी हत्याकांडाची घटना ताजी असतानाच २४ तासांत ही दुसरी घटना समोर आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य संशयित भोंदू बाबाला अटक केली आहे.
भडगाव (वर्धाने) टेंभे फाट्याजवळ जयश्री काकुस्ते (२५) या विवाहितेचा मृतदेह आढळला. तिच्या अंगावर दुचाकी टाकलेली होती व तोंड रुमालाने बांधलेले होते. घटनास्थळी तिचा मोबाईल व पर्स सुरक्षित असल्याने लुटीचा हेतू नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
जयश्री ही खासगी कंपनीत कलेक्शनचे काम करत होती. निजामपूर पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून योगेश उर्फ भैय्या खैरनार याला
ताब्यात घेतले. तो स्वतःला ‘महाराज’ म्हणवत मठात भविष्य सांगण्याचे काम करत होता.
अमावस्येलाच काळेबेरे...
भोंदू महाराजाने चौकशीत वादातून अक्षय सोनवणे (२८) याची रॉडने हत्या करून मृतदेह टेकडीवर पुरल्याची कबुली दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह हस्तगत केला. दोन्ही मृत व्यक्ती भोंदू बाबाकडे कामानिमित्त गेल्या होत्या.
शनि अमावस्येच्या पार्श्वभूमीवर अघोरी पूजेच्या वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी फॉरेन्सिक, डॉग स्क्वॉडच्या मदतीने तपास सुरू ठेवला असून पुढील कारवाई सुरू आहे.
गुढ्या बघून भविष्यकथन...
भोंदूबाबा योगेश हा उभरांडी रस्त्यालगत मठ स्थापन करून गुढ्या बघून भविष्य सांगायचा आणि स्वतःला 'महाराज' म्हणवून घ्यायचा. मृत जयश्री आणि अक्षय हे दोघेही या त्याच्या भजनी लागले होते, असे पोलिसांनी सांगितले.