सोमवारी मुंबई आणि आसपासच्या परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झालं होतं. तसेच अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता. एवढंच नाही तर काही दिवसांपूर्वीच उदधाटन झालेल्या वगळी येथील भुयारी मेट्रोच्या स्थानकातही पाणी शिरलं होतं, या प्रकारावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यातील सत्ताधारी भाजपा आणि भाजपाच्या महायुतीमधील मित्रपक्षांना टोला लगावला आहे. पहिल्याच पावसात भाजप, शिंदे, अजित पवारांच्या भ्रष्टाचाराची त्सुनामी मंत्रालयात पोहचली, घोटाळेबाजांची चौकशी कधी करणार, असा सवाल त्यांनी सत्ताधाऱ्यांना विचारला आहे.
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मुसळधार पावसाने भाजपा युती सरकारचे सर्व दावे फोल ठरले आहेत. कालवे फुटल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भ्रष्टाचार तसेच मुंबई तुंबल्याने एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या भ्रष्टाचाराची त्सुनामी बाहेर पडली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करुनही मुंबईत जागोजागी पाणी साचले, सर्व व्यवस्था कोलमडली. भुयारी मेट्रो मुंबईत शक्य नसल्याचा एमएमआरडीएचा अहवाल असतानाही काही लोकांच्या हट्टासाठी हा प्रकल्प राबविला त्याचे परिणाम आज दिसत आहेत. रात्रीच्या अंधारात हजारो वृक्षांची कत्तल करून मेट्रोचा अट्टाहास पूर्ण केला आहे. सत्ताधारी पक्षाचा कथित विकास एका पावसानेच उघडा पाडल्यानंतरही हे लोक आधीच्या सरकारकडे बोट दाखवून जबाबदारी झटकत आहेत. २५ वर्ष भाजपा शिवसेनेसोबत मुंबई महापालिकेत सत्तेत होती, एकनाथ शिंदे सातत्याने नगर विकास खात्याचे मंत्री आहेत, मग याकाळात भाजपा व एकनाथ शिंदे यांनी काय केले, असा प्रश्न उपस्थित करून सरकारने आरोप प्रत्यारोपाचा खेळ सोडून आत्मपरिक्षण करावे आणि जनतेला मदत करावी.
महाराष्ट्र नैसर्गिक संकटाचा सामना करत असताना राज्याचे मंत्रिमंडळ मात्र अमित शाह यांची खुशामत करण्यात मग्न आहे. आपले मंत्रीपद शाबूत रहावे यासाठी मुख्यमंत्र्यांपासून सर्व मंत्री धडपड करत आहेत. अमित शाह यांनी निवडणुकीच्या प्रचारात दोन सिलिंडर मोफत देणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार, लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणार, अशा वल्गणा केल्या, त्याचा आता त्यांना विसर पडलेला दिसत आहे. अमित शाह महाराष्ट्रावर ओढवलेल्या संकटावर एक शब्दही बोलले नाहीत. आता दिल्लीला जाण्यापूर्वी तरी त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा करून जावी कारण राज्यातील सरकार अमित शाह यांच्या शब्दाशिवाय कामच करत नाही अशी कोपरखळीही हर्षवर्धन सपकाळ यांनी मारली.