"आमदारांनी सह्या केल्या, त्यात माझीही सही, सुनेत्रा पवारांनीच राष्ट्रीय अध्यक्ष व्हावे", राष्ट्रवादीच्या आमदाराची रोखठोक भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 17:35 IST2026-02-04T17:34:02+5:302026-02-04T17:35:05+5:30
महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याच नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष काम करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पण, पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाबद्दल अद्यापही स्पष्टता आलेली नाही.

"आमदारांनी सह्या केल्या, त्यात माझीही सही, सुनेत्रा पवारांनीच राष्ट्रीय अध्यक्ष व्हावे", राष्ट्रवादीच्या आमदाराची रोखठोक भूमिका
अजित पवारांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद रिक्त झाले आहे. या पदाची जबाबदारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनाच मिळणार असल्याचे संकेत पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून दिले गेले आहेत. आमदारांनीही सुनेत्रा पवार यांनाच अध्यक्ष करण्याची मागणी केली आहे. ३० आमदारांच्या सहीचे पत्र तयार करण्यात आले असून, याबद्दल पक्षाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी माहिती दिली.
सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या आमदारांनी एक निवेदन पक्षाच्या वरिष्ठांकडे दिले आहे. ३० आमदारांनी सह्या करून सुनेत्रा पवार यांचीच पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी निवडण्याची मागणी केली आहे.
सुनेत्रा पवारांनीच अध्यक्ष व्हावे
आमदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले, "पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनाच द्यावे असे निवेदन आमदारांनी दिले आहे. त्या निवेदनावर माझी सुद्धा सही आहे."
आमदार चिखलीकर पुढे म्हणाले की, "दोन्ही पक्षाचे विलिनीकरण करायचे की नाही, याचा निर्णय त्यांनीच करावा."
सुनेत्रा पवाराच अध्यक्ष होणार? सुनील तटकरे म्हणाले...
एका मुलाखतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोणाची निवड करण्याबद्दल विचारण्यात आले होते.
सुनील तटकरे म्हणाले, "राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी प्रफुल पटेल किंवा कोणाच्याही नावाची चर्चा नाही. फक्त सुनेत्रा पवार यांचे एकमेव नाव चर्चेत आहेत. पण, मी आधीच याबद्दल काही बोलणार नाही. पक्षाच्या बैठकीतच अंतिम निर्णय होईल", असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे सुनेत्रा पवारांच्या हातीच पक्षाची सूत्रे जाणार असल्याचे संकेत दिले.
प्रफुल पटेलांना करावा लागला खुलासा
अजित पवारांच्या निधनानंतर प्रफुल पटेल हे अध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याच्या चर्चेला तोंड फुटले. वेगवेगळ्या चर्चा सुरू असतानाच प्रफुल पटेल यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन यावर खुलासा केला.
"अध्यक्षपदी योग्य व्यक्तीची निवड केली जाईल. अध्यक्षपदाच्या शर्यतीत मी नाही. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. अध्यक्षपदाचा निर्णयही लवकर घेतला जाईल. पक्षाची धुरा एका योग्य व्यक्तीच्या हाती दिली जाईल, पण मी या शर्यतीत नाही", असे पटेल म्हणालेले.