दमानिया-चाकणकर यांच्यातील वाद तीव्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 08:48 IST2026-04-15T08:47:49+5:302026-04-15T08:48:09+5:30
Ashok Kharat Case: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा व राष्ट्रवादी (अजित पवार)च्या नेत्या रूपाली चाकणकर यांच्यातील वाद अधिक तीव्र झाला आहे. दोघींनीही ‘एक्स’वरील पोस्टमधून गंभीर आरोप केले आहेत.

दमानिया-चाकणकर यांच्यातील वाद तीव्र
मुंबई - भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा व राष्ट्रवादी (अजित पवार)च्या नेत्या रूपाली चाकणकर यांच्यातील वाद अधिक तीव्र झाला आहे. दोघींनीही ‘एक्स’वरील पोस्टमधून गंभीर आरोप केले आहेत.
दमानिया यांनी रूपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा यांच्यावर खोटे बोलल्याचा आरोप केला आहे. प्रतिभा यांनी बँक खाते बनावट आहे, सह्या खोट्या आहेत, असे सांगून जबाबदारी झटकली आहे; पण केवायसी पूर्ण केलेले खाते बनावट असू शकत नाही, असा दावा दमानिया यांनी केला आहे.
प्रतिभा चाकणकरांचे २१८ मेसेज
१ एप्रिल २०२५ ते १७ मार्च २०२६ दरम्यान २३६ कॉल रेकॉर्ड, त्यातील १७ खरातने केलेले, २१८ मेसेज प्रतिभा यांनी खरातला केलेले आहेत. तसेच त्यांचा मुलगा तन्मय चाकणकर याने खरातला ११ कॉल केले तर खरातने त्याला २० कॉल केले, तर ८ मेसेज तन्मयने खरातला केले असून, १ मेसेज खरातने तन्मयला केल्याचा दावा दमानिया यांनी केला.
खोडसाळपणा करण्यासाठी हे पत्र
रूपाली चाकणकर यांनी आरोप खोडून काढताना आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले की, निनावी पत्राबाबत जे कोणी आरोप करणारे आहेत त्यांनी सांगावे की, ते पत्र त्यांच्यापर्यंत कसे आले? बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांनीही ज्या पत्रावर नाव व पत्ता नाही, अशा निनावी पत्राला कायदेशीरदृष्ट्या काहीही अर्थ नसल्याचे म्हटले आहे. तरीही, खोडसाळपणा करण्यासाठी हे पत्र कोणी लिहिले, कोठून आले याची चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी चाकणकर यांनी केली आहे.