कामटेंच्या वायरलेस संभाषणाच्या चौकशीस स्थगिती

By Admin | Updated: June 21, 2015 01:30 IST2015-06-21T01:30:28+5:302015-06-21T01:30:28+5:30

मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्यात शहीद झालेले अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक कामटे यांच्या त्या दिवशी पोलीस नियंत्रण कक्षाशी वायरलेसवरून

Suspension of Kamte's wireless conversation inquiry | कामटेंच्या वायरलेस संभाषणाच्या चौकशीस स्थगिती

कामटेंच्या वायरलेस संभाषणाच्या चौकशीस स्थगिती

मुंबई : मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्यात शहीद झालेले अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक कामटे यांच्या त्या दिवशी पोलीस नियंत्रण कक्षाशी वायरलेसवरून झालेल्या संभाषणाच्या नोंदींमध्ये आढळून आलेल्या कथित तफावतींची राज्य सरकारने चौकशी आयोग नेमून चौकशी करावी, या राज्य माहिती आयोगाने दिलेल्या आदेशास मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे.
२६/११च्या हल्ल्यात एकाच व्हॅनमध्ये बसलेले ‘एटीएस’चे तत्कालिन प्रमुख हेमंत करकरे, ‘चकमक फेम’ पोलीस निरीक्षक विजय साळसकर व अशोक कामटे शहीद झाले होते. त्या व्हॅनमधील बिनतारी संदेश यंत्र व पोलीस नियंत्रण कक्ष यांच्या दरम्यान त्यावेळी झालेल्या संभाषणाच्या नोंदी (लॉग) कामटे यांच्या पत्नी विनिता कामटे यांनी माहिती अधिकार कायद्याखाली मागितल्या होत्या. सुरुवातीस नकार दिल्यानंतर नोव्हेंबर २००९ व फेब्रुवारी २०१० मध्ये त्यांना त्या नोंदी देण्यात आल्या. परंतु त्यात कथित तफावती आढळल्याने श्रीमती कामटे यांनी राज्य माहिती आयुक्तांकडे अर्ज केला होता.
त्यावर, राज्य सरकारने विद्यमान किंवा निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग नेमून या प्रकरणी चौकशी करावी, असा आदेश मुख्य माहिती आयुक्तांनी गेल्या वर्षी ९ जुलै रोजी दिला होता. त्याविरुद्ध राज्य सरकारने केलेली रिट याचिका दाखल करून घेताना न्या. अनूप मोहता व न्या. व्ही. एल. अचलिया यांच्या खंडपीठाने ही स्थगिती दिली.
माहिती अधिकार कायद्यातील तरतुदी पाहता या मुद्द्यावर सविस्तर विचार होणे गरजेचे आहे, असे न्यायालयाने स्थगिती देताना नमूद केले. आता श्रीमती कामटे व माहिती आयुक्तांना नोटीस काढण्यात आली असून अंतिम सुनावणी ३० जुलैला व्हायची आहे. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Suspension of Kamte's wireless conversation inquiry