Sushma Andhare : सुषमा अंधारेंचा शिवसेनेत जाहीर प्रवेश, उपनेतेपदी नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 03:00 PM2022-07-28T15:00:35+5:302022-07-28T15:01:23+5:30

Sushma Andhare : सुषमा अंधारे यांच्यासोबत आणखी काही महिला कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 

Sushma Andhare join Shiv Sena in presence of Uddhav Thackeray | Sushma Andhare : सुषमा अंधारेंचा शिवसेनेत जाहीर प्रवेश, उपनेतेपदी नियुक्ती

Sushma Andhare : सुषमा अंधारेंचा शिवसेनेत जाहीर प्रवेश, उपनेतेपदी नियुक्ती

googlenewsNext

मुंबई : सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्या माध्यमातून शिवसेनेला (Shiv Sena)आंबेडकरी चळवळीतला नवा चेहरा मिळाला आहे.चळवळीतील कार्यकर्त्या आणि प्रसिद्ध वक्त्या सुषमा अंधारे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत गुरुवारी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी, शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी त्यांच्या हातावर शिवबंधन बांधले. त्यांच्यासोबत आणखी काही महिला कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 

सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर उपनेतेपदाची जबाबदारी सोपविली. सुषमा अंधारे यांच्यामुळे पुण्यात शिवसेनेला मिळणार आक्रमक चेहरा मिळणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. दरम्यान, सुषमा अंधारे या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत्या. काही दिवसापूर्वी सुषमा अंधारे यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांची भेट घेतली होती. यानंतर आज सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 

यावेळी सुषमा अंधारे म्हणाल्या, "ईडी, सीबीआय आणि निवडणूक आयोग अशा सर्व स्वायत्त संस्थांना हाताशी धरुन जर इथं संविधानिक लोकशाहीची चौकट मोडण्याचा प्रयत्न केला जात असेल तर अशावेळी भाजपविरोधात निकराने झुंज देणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत आम्ही धर्मनिरपेक्षतावादी लोकांनी असले पाहिजे, असे मला प्रामाणिकपणे वाटतंय म्हणून मी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

याचबरोबर, माझ्या डोक्यावर ईडीचं ओझं नाही, मी आत्तापर्यंत बाबासाहेब आंबेडकरांची लेक म्हणून जो लौकिक मिळाला आहे. त्यानुसार मी काम करत राहिन. आज जोरजोरात रडायचं आणि उद्या दुसऱ्या गटात सामिल व्हायचं हे माझ्याकडून होणार नाही. कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू चांगले अशा अर्थानं मी उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व मान्य करत आहे, असेही सुषमा अंधारे म्हणाल्या.

दरम्यान, सुषमाताई आणि तुमचे लढणारे सैनिक माझ्यासोबत आलेत, तेही लढाई ऐन भरात असताना. या साथीसोबतीला महत्व आहे. तीर्थप्रसादाला तर सर्वजण येतात पण लढाईत खांद्याला खांदा लाऊन जे येतात त्यांचे महत्व आयुष्यभर राहते. खऱ्याखुऱ्या शिवसेनेच्या पुनर्बांधणीसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असे यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले. 

शिवसेनेला आंबेडकरी चळवळीतला नवा चेहरा मिळाला
शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले भाजप सोबत गेले. मात्र, आता पुन्हा एकदा सुषमा अंधारे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे शिव शक्ती – भिम शक्ती असा नारा ऐकायला मिळणार आहे. सुषमा अंधारे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या घोषणेनंतर त्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेली भाषणे पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. या भाषणांमध्ये सुषमा अंधारे यांनी जाहीर सभांमध्ये उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत गंभीर टीका केल्या आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीच्या प्रचार सभांमध्ये सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवरही निशाणा साधला होता.

Web Title: Sushma Andhare join Shiv Sena in presence of Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.