राज्यात ५ हजार किडनी, तर १ हजार जण यकृताच्या प्रतीक्षेत; एक देहदान अनेकांसाठी जीवनदान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2021 02:49 AM2021-01-24T02:49:27+5:302021-01-24T02:50:38+5:30

अवयव प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षा यादी वाढली : ८९ जणांना हवे हृदय, तर ४८ जणांना स्वादुपिंड

In the state, 5,000 kidneys are waiting, while 1,000 are waiting for liver | राज्यात ५ हजार किडनी, तर १ हजार जण यकृताच्या प्रतीक्षेत; एक देहदान अनेकांसाठी जीवनदान

राज्यात ५ हजार किडनी, तर १ हजार जण यकृताच्या प्रतीक्षेत; एक देहदान अनेकांसाठी जीवनदान

Next

दीपक शिंदे

सातारा : मानवासाठी प्रत्येक अवयव महत्त्वाचा आहे. मृत्यूनंतर आपला अवयव एखाद्याच्या जीवनाला उभारी देणारा ठरला तर जीवन सार्थक होईल. सध्या राज्यात ५ हजार ४८७  जणांना किडनीची, तर १०९५ जणांनी यकृताची आवश्यकता आहे. १९ जण फुप्फुसाच्या, तर ८९ जण हृदयाच्या प्रतीक्षेत आहेत. आज नाही तर उद्या एखादा अवयव मिळेल म्हणून अनेक रुग्णांचे नातेवाईक रुग्णालयात चकरा मारतात. 

दररोज उगवणारा दिवस अनेक पालकांसाठी नवी आशा घेऊन उगवत असतो. आज नाही तर उद्या अवयव मिळेल या प्रतीक्षेत अनेक जण आहेत. रुग्णालयातून आपल्या नातेवाइकाला अवयव मिळाला असा निरोप येण्याची ते आतुरतेने वाट पाहत आहेत; पण आपल्या समाजात देहदानाऐवजी मृत्यूनंतर पंचतत्त्वात विलीन करण्याकडे अधिक कल आहे. आपले एक देहदान अनेकांसाठी जीवनदान असते 
याचा विचार होणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. 

मृत व्यक्तीचे सर्वच अवयव उपयोगी येतात असे नाही. मात्र, अपघातामध्ये एखादी व्यक्ती गंभीर जखमी होऊन तिचा मेंदू मृत झाला तर तिच्या पालकांच्या संमतीने त्या व्यक्तीचे अवयव इतरांसाठी वरदान ठरू शकतात.  अवयव दानामध्येही रक्तगट जुळणे आणि अवयव जुळणे महत्त्वाचे असते. त्याबरोबरच याठिकाणी कोणताही वशिला उपयोगाचा ठरत नाही. त्यामुळे सरकारी प्रतीक्षा यादीनुसार अवयव आवश्यक असलेल्या व्यक्तीला ते दिले जातात. एखादी व्यक्ती खरंच अंतिम स्टेजवर असेल तरच त्याचा प्राधान्यक्रम लागतो. मात्र, हे सर्व डॉक्टरांच्या सल्ल्यानेच होत असते. तोपर्यंत अनेकांना अवयवाच्या प्रतीक्षेत जीवही गमवावा लागतो. त्यासाठी अवयवदान ही एक चळवळ होणे आवश्यक आहे. काही सामाजिक संस्था यासाठी प्रयत्नरत आहेत. त्यांना समाजाकडून सहकार्याची अपेक्षा आहे. 

अवयव प्रत्यारोपनापूर्वी आणि प्रत्यारोपनानंतर दोन्ही वेळेस रुग्णांची मानसिक तयारी करावी लागते. जास्तीत जास्त लोकांनी अवयवदान करावे यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. त्याला काही अंशी यशही येत आहे. तरीदेखील राज्य आणि देशभरात अनेक ठिकाणी अवयवदानाचे महत्त्व पटवून देण्याचे काम संस्थेच्या वतीने केले जाते.  - धीरज गोडसे, संस्थापक,  कोमल न्यू लाइफ फाउंडेशन, सातारा
 

Web Title: In the state, 5,000 kidneys are waiting, while 1,000 are waiting for liver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.