शिवसेनेच्या भूमिकेला किंमत नाही - काँग्रेस

By Admin | Updated: May 27, 2014 05:28 IST2014-05-27T05:28:44+5:302014-05-27T05:28:44+5:30

शिवसेनेच्या भंपक पाकिस्तानविरोधाला पंतप्रधान नरेंद्र मोदी भीक घालणार नाहीत

Shivsena's role is not worth - Congress | शिवसेनेच्या भूमिकेला किंमत नाही - काँग्रेस

शिवसेनेच्या भूमिकेला किंमत नाही - काँग्रेस

मुंबई : शिवसेनेच्या भंपक पाकिस्तानविरोधाला पंतप्रधान नरेंद्र मोदी भीक घालणार नाहीत, हे लक्षात आल्यामुळेच शिवसेनेने पाकिस्तानबाबतची आपली तथाकथित आक्रमकता गुंडाळून केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होण्याचा व शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याचा निर्णय घेतल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे. यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या एका निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, भारतीय जनता पक्षाने कधीही शिवसेनेच्या पाकिस्तानबाबतच्या धोरणाला फारशी किंमत दिलेली नाही. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना शिवसेनेने पाकिस्तानसोबतच्या युद्धबंदीला विरोध केला होता. त्या वेळी राज्यसभेत बोलताना वाजपेयींनी शिवसेना अतिरेक्यांपेक्षा अधिक धोकादायक असल्याचे म्हटले होते. वाजपेयींच्या काळात शिवसेनेला दहशतवाद्यांपेक्षा अधिक अविश्वासार्ह मानणारी भाजपा आता मोदींच्या काळात शिवसेनेला काय किंमत देत असेल, याबाबत न बोललेलेच बरे. चारच दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी पाकिस्तानशी क्रिकेट संबंध तोडण्याची भाषा वापरली होती. तरीही मोदींनी नवाज शरिफ यांना निमंत्रण पाठवून शिवसेनेच्या मताला कचर्‍याची टोपली दाखवली. शरीफ यांच्या दौर्‍याबाबत शिवसेनेच्या विरोधाची नरेंद्र मोदी साधी दखलसुद्धा घेणार नाहीत, याची खात्री असल्यानेच शिवसेनेने विरोध गुंडाळून ठेवला, असेही काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Shivsena's role is not worth - Congress