NCP vs Eknath Shinde: "तर बंडखोर आमदारांनी शिवसेना फोडली नसती"; राष्ट्रवादीची शिंदे गटावर जोरदार टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 09:05 PM2022-08-11T21:05:22+5:302022-08-11T21:05:51+5:30

मंत्रिमंडळाती वजनदार खात्यांसाठी भाजपा-शिंदे गटात चढाओढ सुरू असल्याचाही केला दावा

Sharad Pawar led NCP slams Eknath Shinde Group of Shiv Sena Rebel MLAs over Balasaheb Thackeray ideology | NCP vs Eknath Shinde: "तर बंडखोर आमदारांनी शिवसेना फोडली नसती"; राष्ट्रवादीची शिंदे गटावर जोरदार टीका

NCP vs Eknath Shinde: "तर बंडखोर आमदारांनी शिवसेना फोडली नसती"; राष्ट्रवादीची शिंदे गटावर जोरदार टीका

googlenewsNext

NCP vs Eknath Shinde: महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर ९ ऑगस्टला मार्गी लागला. सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा पहिला टप्पा पार पडत, भाजपाचे ९ आणि शिंदे गटाचे ९ अशी एकूण १८ आमदारांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ दिली. भाजपा आणि शिंदे गटातील अनेक मंत्र्यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती. तसेच काही अपक्ष आमदारांनाही अपेक्षा असल्याचे दिसले. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात त्या सर्वांना संधी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. मात्र परवा शपथ घेतलेल्या मंत्रिमंडळातील शिंदे गटाने आज बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. त्यावरून राष्ट्रवादीने शिंदे गटावर टीकास्त्र सोडले.

"ईडी सरकारमधील मंत्र्यांनी आज बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. हे दर्शन आस्थेपोटी घेतले असते तर त्यांनी शिवसेना फोडली नसती", अशी जहरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली. "शिवसेनेत बंड करायचे आणि आस्था आमची बाळासाहेबांशी आहे हे दाखवायचं यामध्ये आस्था किती आणि लालसा किती हे राज्यातील जनतेला कळून चुकलं आहे", असा आरोपही त्यांनी केला.

"भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीस्थळापासून काही अंतरावर आहे. परंतु ज्या लोकांकडून भारतीय राज्यघटनेची पायमल्ली केली  गेली आहे त्यांच्याकडून स्मारकाचे दर्शन घेतले जाईल का हा विचार करणंच चुकीचं आहे. ज्यांना घटनाच मान्य नाही ते डॉ. बाबासाहेबांचा काय आदर करणार आहेत?", असा खोचक सवालही त्यांनी उपस्थित केला.

"ईडी सरकारमधील मंत्र्यांनी शपथ घेतली पण कोणत्या मंत्र्यांकडे कोणती खाती असणार आहे याची स्पष्टता दिसत नाही. शिंदे गटावर भाजपचा दबाव असल्याने शिंदे गटाला दुय्यम दर्जाची खाती देऊन भाजप आपल्याकडे वजनदार खाती ठेवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शिंदे गटात सध्या चढाओढ सुरू असून एकवाक्यता नसल्याने हे सरकार अधिवेशनाला कसे सामोरे जाणार हा खरा प्रश्न आहे", अशा शब्दांत त्यांनी कुत्सित टीकाही केली.

 

Web Title: Sharad Pawar led NCP slams Eknath Shinde Group of Shiv Sena Rebel MLAs over Balasaheb Thackeray ideology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.