"अशी घाणेरडी, गलिच्छ कृती केल्यास..."; सातारा महिला डॉक्टर प्रकरणात सुप्रिया सुळेंचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 14:20 IST2025-10-24T14:17:50+5:302025-10-24T14:20:33+5:30
Satara Crime Lady Doctor Case: महिला डॉक्टरवर ४ महिने पोलिस इन्स्पेक्टरने बलात्कार केल्याचा आरोप

"अशी घाणेरडी, गलिच्छ कृती केल्यास..."; सातारा महिला डॉक्टर प्रकरणात सुप्रिया सुळेंचा संताप
Satara Crime Lady Doctor Case: साताऱ्यातील फलटणमध्ये उपजिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ महिला डॉक्टरनेपोलिसांच्या जाचाला कंटाळून आपले जीवन संपवले. ही महिला डॉक्टर काही महिन्यांपासून पोलीस आणि आरोग्य विभागाच्या वादात अडकली होती. तपासणीसंदर्भात पोलिसांशी झालेल्या वादानंतर तिची चौकशी सुरू झाली. या चौकशीमुळे ती मानसिक तणावात होती. त्यातच, पोलिस निरीक्षक गोपाल बदनेने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. अखेर हे सारं सहन न झाल्याने हातावर सुसाईड नोट लिहून तिने आत्महत्या केली. घडलेल्या प्रकारानंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या संदर्भात संतप्त प्रतिक्रिया दिली.
"हा प्रकार धक्कादायक आहे. सुसंस्कृत महाराष्ट्रात अशा घटना होत आहेत हे अतिशय लाजिरवाणं आहे. अशा घटनेने महाराष्ट्रातील सर्वांचीच मान शरमेने खाली जाते. हा प्रकार अतिशय दुर्दैवी आहे. असे प्रकार आपल्या संस्कारात बसत नाहीत. त्यामुळे माझा आग्रह आहे की या प्रकरणाची पारदर्शकपणे चौकशी झाली पाहिजे. कुणीही अशी घाणेरडे, गलिच्छ कृत्य केल्यास त्या माणसाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे," असे सडेतोड मत सुप्रिया सुळे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना मांडले.
"मी आधी अनेक वेळा हा मुद्दा मांडला आहे की कृपा करून फास्ट ट्रॅक कोर्ट करा आणि अशा गुन्हेगारांना थेट फाशी द्या. अशा प्रकरणांमध्ये गंभीर दखल घेऊन उदाहरण उभे करण्याची नितांत गरज आहे की, महाराष्ट्र सरकार किंवा भारत सरकार अशा प्रकारच्या घटना खपवून घेणार नाही आणि असे प्रकार सहन केले जाणार नाहीत," अशी मागणीही त्यांनी केली.
फलटण, जि. सातारा येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत महिला डॉक्टरचे आत्महत्या प्रकरण अतिशय गंभीर आहे. या महिलेने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये तिने गेली काही दिवसांपासून तिचा शारिरीक आणि मानसिक छळ होत असल्याचे वरीष्ठांना वारंवार कळविले होते. परंतु तिच्या तक्रारीची दखल घेतली गेली…
— Supriya Sule (@supriya_sule) October 24, 2025
तसेच, सोशल मीडिया एक्सवरही त्यांनी आपल्या भावना मांडल्या. "फलटण, जि. सातारा येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत महिला डॉक्टरचे आत्महत्या प्रकरण अतिशय गंभीर आहे. या महिलेने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये तिने गेली काही दिवसांपासून तिचा शारिरीक आणि मानसिक छळ होत असल्याचे वरीष्ठांना वारंवार कळविले होते. परंतु तिच्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही. अखेर तिने टोकाचे पाऊल उचलले. या विषयाच्या मूळाशी नेमके कोणते कारण आहे? या महिलेच्या तक्रारीची दखल का घेतली गेली नाही? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजेत. संबंधित महिलेला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांना शिक्षा होणे आवश्यक आहे. माझी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आग्रही मागणी आहे की या प्रकरणाची चौकशी करुन दोषी व्यक्तींना कठोर शासन करावे. आरोग्य यंत्रणेत काम करणाऱ्या तसेच राज्यातील प्रत्येक महिलेला सुरक्षित वातावरण मिळालेच पाहिजे ही आमची भूमिका आहे," असे त्यांनी लिहिले.