PSI सोबतची 'ती' दुसरी व्यक्ती कोण? डॉक्टरने हातावर लिहिलेल्या 'त्या' नावाची ओळख उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 13:42 IST2025-10-24T13:22:38+5:302025-10-24T13:42:34+5:30
महिला डॉक्टरच्या मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.

PSI सोबतची 'ती' दुसरी व्यक्ती कोण? डॉक्टरने हातावर लिहिलेल्या 'त्या' नावाची ओळख उघड
Satara Crime: साताऱ्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाने वेगळं वळण घेतलं आहे. महिला डॉक्टरच्या आत्महत्येमुळे संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. एका हॉटेलच्या खोलीत महिला डॉक्टरने गळफास लावून घेतला होता. आत्महत्येपूर्वी डॉक्टरने हातावर दोन जणांची नावे लिहून त्यांना मृत्यूसाठी जबाबदार धरलं. यामध्ये एका पोलीस उपनिरीक्षकाचेही नाव असून त्याने चार वेळा बलात्कार केल्याचे पीडितेने लिहिलं आहे. त्यामुळे थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेत कारवाईचे आदेश दिले. तर दुसरी व्यक्ती हा पीडितेच्या घरमालकाचा मुलगा असल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे या प्रकणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.
सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात घडलेल्या घटनेने सर्वांना हादरवून सोडलं आहे. रुग्णालयात कार्यरत महिला डॉक्टरने गुरुवारी रात्री एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली. हॉटेल कर्मचाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला तेव्हा महिला डॉक्टरचा मृतदेह आढळून आला. महिलेच्या हातावर पीएसआय गोपल बदने आणि प्रशांत बनकर या दोघांची नावे लिहीली होती. गोपाल बदनेने आपल्यावर चार वेळा बलात्कार केला तर बनकरने शारीरिक आणि मानसिक छळ केल्याने आत्महत्या करत असल्याचे महिलेने हातावर लिहून ठेवलं होतं. याप्रकरणी साताऱ्याचे पोलीस अधिक्षक तुषार दोशी यांनी बदनेला निलंबित केल्याची माहिती दिली आहे.
"या प्रकरणात नातेवाईकांच्या तक्रारीनंतर दोघांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच्यामध्ये एक आरोपी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमधील पीएसआय गोपाळ बदने आहे. दुसरा आरोपी प्रशांत बनकर हा पोलीस कर्मचारी नाही. तो सामान्य नागरिक आहे. या प्रकरणात गोपाळ बदने यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यासाठी आमच्या पोलीस पथक रवाना झाले आहे. महिला डॉक्टरवर कुठल्या प्रकारचा दबाव होता याची आम्ही माहिती घेत आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात कडक कारवाई करण्याचा आदेश दिले आहेत. आरोपींना तात्काळ अटक करण्यात सांगितले आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर मला आत्महत्या केली आहे असं कळालं. मात्र ज्यावेळी हातावर लिहिलेलं दिसलं त्यानंतर ही गोष्ट समोर आली. त्यामध्ये महिला डॉक्टरने दोन नाव घेतलेली आहेत. याप्रकरणी आधी कुठे तक्रार दाखल झाली होती का हे पोलीस तपासात समोर येईल," असे साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सांगितले.
"सुरुवातीला महिला डॉक्टरने आत्महत्या केली आहे असं कळालं. तिथे पोलीस गेल्यानंतर महिलेने गळफास लावून घेतला होता. त्यानंतर हातावर लिहिलेला मजकूर दिसून आला. त्यामध्ये शारीरिक आणि मानसिक क्षणाचा उल्लेख होता. मी आता जेवढे दिवस इथे आहेत त्यात तरी पीएसआय गोपाल बदणे बद्दल अशी काही पार्श्वभूमी होती असं ऐकलेलं नाही. आता या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला आहे. आरोपीचा पूर्वी यात काही हात सहभाग होता का, त्यांच्या विरोधात काही अर्ज आलेत का या सर्व बाबींची तपासात चौकशी होईल. दुसरी व्यक्ती ही सामान्य नागरिक आहे. पीडिता ही प्रशांत बनकरच्या वडिलांच्या घरी भाड्याने राहायला होती," असेही तुषार दोशींनी सांगितले.