राज्यात पावसाचे पुनरागमन होणार; मध्य महाराष्ट्र,मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 07:36 PM2020-07-22T19:36:26+5:302020-07-22T19:37:13+5:30

गेल्या २४ तासात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस

Rains will return everywhere in the state | राज्यात पावसाचे पुनरागमन होणार; मध्य महाराष्ट्र,मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता

राज्यात पावसाचे पुनरागमन होणार; मध्य महाराष्ट्र,मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता

Next
ठळक मुद्दे२३ व २४ जुलै रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता

पुणे : गेल्या काही दिवस ओढ लावलेल्या पावसाचे राज्यात सर्वत्र पुन्हा आगमन होत असून पुढील दोन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
 गेल्या २४ तासात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. विदर्भातही बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला. 
मध्य महाराष्ट्रातील गगनबावडा ११०, गडहिंग्लज ५०, हर्सूल ३०, खंडाळा बावडा, फलटण, विटा २० मिमी पावसाची नोंद झाली होती. मराठवाड्यातील अहमदपूर, चाकून, केज, तुळजापूर, वडावणी येथे २० मिमी पाऊस पडला.  विदर्भातील वर्धा ६०, ब्रम्हपुरी, सेलू ३०, देसाईगंज, हिंगणा, कुरखेडा २० मिमी पावसाची नोंद झाली होती. घाटमाथ्यावरील शिरगाव ५०, कोयना (पोफळी) ४०, डुंगरवाडी ३० मिमी पाऊस झाला होता. 
२३ व २४ जुलै रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असून विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. २५ जुलै रोजी कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.२६ जुलै रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
़़़़़़़़़़
दोन दिवस या जिल्ह्यात पावसाची शक्यता
२३ व २४ जुलै रोजी रायगड, रत्नागिरी, नाशिक, अहमदनगर, सातारा, औरंगाबाद, जालना, बीड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. २३ जुलैला उस्मानाबाद तर, २४ जुलै रोजी हिंगोली, नांदेड, लातूर, कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. 
पुणे, सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात २४ व २५ जुलै रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे.  
२५ व २६ जुलै रोजी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Web Title: Rains will return everywhere in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.