राजकीय स्थैर्य, मात्र अर्थव्यवस्थेवर ताण येईल; भेंडवड येथील घटमांडणी भाकितातून संकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 14:38 IST2026-04-21T14:37:29+5:302026-04-21T14:38:46+5:30
राज्यासह देशातील राजकीय स्थिती सध्या स्थिर राहण्याचे संकेत भेंडवड येथील पारंपरिक घटमांडणीच्या भाकितातून मिळाले आहेत.

राजकीय स्थैर्य, मात्र अर्थव्यवस्थेवर ताण येईल; भेंडवड येथील घटमांडणी भाकितातून संकेत
जयदेव वानखडे
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव जामोद (जि. बुलढाणा) : राज्यासह देशातील राजकीय स्थिती सध्या स्थिर राहण्याचे संकेत भेंडवड येथील पारंपरिक घटमांडणीच्या भाकितातून मिळाले आहेत. नैसर्गिक संकटांची शक्यता, पिकांवरील रोगराईचे सावट व युद्धजन्य परिस्थितीमुळे देशाच्या संरक्षण व्यवस्थेवर व अर्थव्यवस्थेवर ताण वाढण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. साडेतीनशे वर्षांची परंपरा लाभलेले हे अंदाज ऐकण्यासाठी राज्यभरातून शेतकरी व नागरिकांनी उपस्थिती लावली.
तूर्तास सत्तांतर नाही: पानविडा हा राजा व सत्तेचे प्रतीक मानला जातो. यंदा विड्याचे पान व सुपारी स्थिर आढळल्याने सत्तांतराची शक्यता नसून, विद्यमान सत्ता कायम राहील, असा अर्थ लावण्यात आला. बाह्य शत्रूंच्या हालचाली व नैसर्गिक संकटांमुळे सत्ताधाऱ्यांवर ताण वाढण्याची शक्यता नाही. अर्थव्यवस्थेबाबतही इशारा देण्यात आला आहे. तसेच अतिवृष्टीसोबतच अवकाळी पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
पिकांवर रोगराई, मानवी आरोग्यावरही परिणाम
घटमांडणीतील निरीक्षणानुसार भूकंप, महापूर, अतिवृष्टी यांसारख्या नैसर्गिक आपत्तींची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. भादली धान्य सर्वत्र पसरल्याने पिकांवर रोगराईचे सावट राहील तसेच मानवी आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मंदी वाढण्याची शक्यता
करंजी फुटलेली आढळल्याने आर्थिक अस्थिरतेचे संकेत मिळाले आहेत. महागाई, मंदी वाढण्याची शक्यता आहे.