पोलीस झाल्याचे बॅनर झळकावले; गावभर पेढे वाटले; नंतर पोलिसांनी घरी जाऊन वाजवला बँड
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 12:50 IST2026-04-22T12:50:18+5:302026-04-22T12:50:56+5:30
पोलीस झाल्याचे बॅनर झळकावून गावभर पेढे वाटणाऱ्या तरुणाला पोलिसांनी चांगलाच इंगा दाखवला आहे.

पोलीस झाल्याचे बॅनर झळकावले; गावभर पेढे वाटले; नंतर पोलिसांनी घरी जाऊन वाजवला बँड
कल्याणराव आवताडे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे/धायरी : ‘सिंघम’ किंवा ‘सिम्बा’सारख्या चित्रपटांचा प्रभाव म्हणायचा की मुलीवाल्यांनी लग्नासाठी केलेली अट? एका तरुणाने आपली पोलीस म्हणून निवड झाल्याचे फ्लेक्स झळकावले, पेढे वाटले आणि चक्क पोलिसांना आपल्या दारी ओढून घेतलं. पण हा ‘आनंदोत्सव’ काहीच तासांत गुन्हा बनला आणि नऱ्हे पोलिसांनी तरुणाचा हा ट्रेण्डसेटर करण्याचा बनाव उघड केला. ऋषिकेश जाधव असे या आगळे वेगळे धाडस करणाऱ्याचे नाव आहे.
आईच्या आनंदासाठी धाडस...
सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे येथील तिडके डेअरी भागात राहाणारा ऋषिकेश आपल्या आईसह भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतो. त्याचे पोलिस होण्याचे स्वप्न होते; पण उंची कमी पडल्याने पोलिस भरतीचे दार त्याच्यासाठी बंद झाले. घरच्यांनी लग्नासाठी तगादा लावला होता. कदाचित ‘मुलगा पोलिस आहे’ असे सांगितले तर चांगले स्थळ येईल किंवा केवळ आईचा आनंद पाहण्यासाठी ऋषिकेशने एक भयंकर धाडस केले. त्याने आपण ‘पुणे पोलिस’ दलात भरती झाल्याची खोटी बातमी घरी दिली. सोसायटीमध्ये पेढे वाटले, चौकात स्वतःच्या फोटोसह ‘पुणे पोलिसपदी निवड’ झाल्याचे भव्य फ्लेक्स देखील लावले. मोबाइलवर पोलिस वर्दीतील फोटो व्हॉट्सॲप स्टेटस ठेवले.
फ्लेक्स नजरेस पडला अन्...
पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांच्या नजरेत फ्लेक्स आला. त्याची उंची कमी असल्याने पोलिसांना संशय आला. पोलिसांनी कागदपत्रे आणि नियुक्तिपत्राची चौकशी केली, तेव्हा ऋषिकेशची बोबडी वळली. तपासात हा सर्व प्रकार केवळ एक ‘दिखावा’ असल्याचे उघड झाले असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.