Onion Price: अवकाळीचा शेतीला फटका, कांद्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 15:56 IST2025-05-26T15:54:25+5:302025-05-26T15:56:51+5:30

Maharashtra Unseasonal Rains: राज्यात मान्सूनपूर्व पाऊस दाखल झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

Onion Price: Unseasonal weather hits agriculture, onion prices likely to increase | Onion Price: अवकाळीचा शेतीला फटका, कांद्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता

Onion Price: अवकाळीचा शेतीला फटका, कांद्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता

राज्यात मान्सूनपूर्व पाऊस दाखल झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पावसामुळे फळबागातदारांसह कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी शेतातच कांदा साठवून ठेवला. मात्र, आता झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा सडला असून उत्पादकांना मोठा फटका बसला. त्यामुळे येत्या काही दिवसांत कांद्याची आवक कमी होऊन दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादकांना फटका
कोकण, नाशिक, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, अमरावती आणि नागपूर ६ मे पासूनच सतत पाऊस पडत आहे, हे जिल्हे कांदा उत्पादनासाठी ओळखले जातात.  याशिवाय, धुळे, अहिल्यानगर, सोलापूर, बीड, धाराशिव, अकोला, जालना, बुलढाणा आणि जळगाव येथील शेतकऱ्यांनीही पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याची नोंद केली.

कांद्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता
मार्चपूर्वी कापणी केलेल्या शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळाले. परंतु एप्रिल किंवा मे पर्यंत वाट पाहणाऱ्यांच्या पिकांवर आधी अति उष्णतेचा आणि नंतर पावसाचा परिणाम झाला. दरम्यान,२० मे पर्यंत लासलगाव बाजारात कांद्याची सरासरी किंमत प्रति क्विंटल १ हजार १५० रुपये इतकी होती. मात्र, अवकाळी पावसामुळे कांद्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परिणामी, बाजारात कांद्याचा पुरवठा कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कांद्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. 

शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता
महाराष्ट्र हा देशातील आघाडीचा कांदा निर्यातदार आहे. नाशिक हे देशातील सर्वात मोठे कांदा उत्पादक क्षेत्र आहे. दरम्यान, २०२४-२५ मध्ये २ लाख ९० हजार १३६ हेक्टरवर कांदा पिकाची लागवड करण्यात आल्याची माहिती आहे. महत्त्वाचे म्हणजे, कांद्याचे भाव वाढल्यानंतर सरकार निर्यात शुल्क, किमान निर्यात किंमत आणि निर्यातीवर बंदी घालून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पावले उचलते, ज्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते.

Web Title: Onion Price: Unseasonal weather hits agriculture, onion prices likely to increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.