महापरीक्षा पोर्टलवरून अपारदर्शक ‘महाभरती’?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 12:08 PM2019-09-30T12:08:04+5:302019-09-30T12:12:18+5:30

शासनाकडून अद्याप कोणताही निर्णय नाही : विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता...

no clearness 'Mahabharati' in the Exam Portal? | महापरीक्षा पोर्टलवरून अपारदर्शक ‘महाभरती’?

महापरीक्षा पोर्टलवरून अपारदर्शक ‘महाभरती’?

Next
ठळक मुद्देविविध महत्त्वाच्या शासकीय पदांवर चुकीच्या मार्गाने काही उमेदवारांची नियुक्तीरिलॉगीन करून त्यांच्या उत्तरामध्ये बदल केला जात असल्याचा विद्यार्थ्यांकडून आरोप

पुणे : राज्यातील विविध जिल्ह्यांत स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाºया विद्यार्थ्यांनी महापरीक्षा पोर्टल बंद करून सर्व पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) माध्यमातून घ्यावी, या मागणीसाठी सुमारे ६५ मोर्चे काढले. या पोर्टलवरून चुकीच्या पद्धतीने केल्या जाणाऱ्या भरती प्रक्रियेवर आक्षेप घेऊन त्याबाबतचे सबळ पुरावे सादर केले. मात्र, महापोर्टलद्वारे सुरू असलेली अपारदर्शक ‘महाभरती’ थांबविण्याबाबत शासनाकडून कोणताही निर्णय घेतला जात नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता असल्याचे दिसून येत आहे.
महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून राज्य शासनाने न्यायवैद्यक प्रयोगशाळा, महाराष्ट्र गृहनिर्माण विभागातील पदे तसेच आरोग्यसेवक, कृषीसेवक, पुरवठा निरीक्षक, तलाठी, लिपिक आदी पदांची भरती महापरीक्षा पोर्टलद्वारे घेतली जाते. मात्र, बहुतांश परीक्षांमध्ये गोंधळ होत असल्याने विद्यार्थ्यांनी विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढले. राज्यात आत्तापर्यंत ६५ मोर्चे निघाले आहेत. परंतु, या मोर्चांची शासनाकडून दखल घेण्यात आली नाही. विविध महत्त्वाच्या शासकीय पदांवर चुकीच्या मार्गाने काही उमेदवारांची नियुक्ती होत असूनही शासन गप्प का? असा सवाल स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.
अमरावती व बुलडाणा या जिल्ह्यातील ठरावीक परीक्षा केंद्रातील विद्यार्थ्यांची काही पदांवर नियुक्ती झाली आहे. तसेच एकाच कुटुंबातील दोन-तीन व्यक्तींची निवड केली आहे. गुणवत्ता यादीतील उमेदवारांना असलेल्या गुणांपेक्षा अधिक गुण असूनही काही विद्यार्थ्यांना नियुक्ती दिली गेली नाही, असा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात मोबाईल घेऊन जाता येते. 
परीक्षेचे सुपरव्हिजन महाविद्यालयातील प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना करतात. त्यामुळे ही परीक्षा पारदर्शकपणे होत नाही. एमएससीआयटी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना या परीक्षेचा निकाल तात्काळ मिळतो. त्यानुसार महापरीक्षा पोर्टलवरून परीक्षेचा निकाल दिला जात नाही. या उलट विद्यार्थ्यांचे रिलॉगीन करून त्यांच्या उत्तरामध्ये बदल केला जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून केला जात आहे.
.......
इतर संवर्गातील उमेदवारांना नियुक्ती दिल्या...
पेसा क्षेत्रातील गावांमधील तलाठी भरतीसाठी अनुसूचित क्षेत्रातील व अनुसूचिती जमातीमधील उमेदवारांना नियुक्ती देणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र, अनुसूचित जमातीमधील उमेदवाराला डावलून इतर संवर्गातील उमेदवारांना नियुक्ती दिल्या आहेत, याचा शासनाने पुनर्विचार करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
........
महापोर्टलवरून गुणवत्ता डावलून नियुक्ती दिली जाते. विद्यार्थ्यांची उत्तरे परीक्षा झाल्यानंतर बदलली जातात. अनेक विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीपासून दूर ठेवले जाते. त्यामुळे महापोर्टलवरून अपात्र मुलांना नियुक्ती दिल्याचे दिसून येते.- रविराज राठोड, स्पर्धा परीक्षा, विद्यार्थी
.........
राज्यातील काही निवडक परीक्षा केंद्रातील २० ते २२ विद्यार्थी नियुक्त होत असल्याची माहिती आम्ही जमा केली आहे. तसेच एका परीक्षा केंद्रावर गोंधळ झाला असून, त्याची चौकशी करावी, अशी लेखी तक्रार त्याच दिवशी महापरीक्षा पोर्टलला ई-मेलवरून पाठविण्यात आली होती. त्याची दखल घेतली गेली नाही. उलट संबंधित केंद्रातील मुलांची नावे गुणवत्ता यादीत प्रसिद्ध करून त्यांना नियुक्ती दिली गली. अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील विशिष्ट केंद्रावर परीक्षा देण्यासाठी राज्यातील विविध भागांतून विद्यार्थी जात आहेत. ही बाब विचार करण्यासारखी आहे.
- राहुल कविटकर, स्पर्धा परीक्षा, विद्यार्थी
........
महापरीक्षा पोर्टलकडून घेतल्या जाणाºया परीक्षेचा दर्जा ढासळलेला आहे. द्वितीय श्रेणी पदाच्या परीक्षेसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण?, शाहरूख खानच्या पत्नीचे नाव काय?, काखेत कळसा अन् गावाला......? देशाच्या पंतप्रधानांचे नाव काय? अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. त्यातही परीक्षेत पारदर्शकता राखली जात नाही. तसेच पेसा क्षेत्रासाठी तलाठी भरती करताना स्वतंत्र विचार केला जात नाही. त्यामुळे महापरीक्षा पोर्टलवरून अपारदर्शक पद्धतीने महाभरती सुरू असल्याचे दिसून येते.- महेश बढे, स्पर्धा परीक्षा,विद्यार्थी

Web Title: no clearness 'Mahabharati' in the Exam Portal?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.