“स्वयंघोषित गांधी २०१४ नंतर गायब, खरे गांधीवादी असते तर...”; रोहित पवारांची अण्णा हजारेंवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 03:03 PM2024-05-23T15:03:20+5:302024-05-23T15:04:41+5:30

Rohit Pawar Replied Anna Hazare:

ncp sp group Rohit pawar replied anna hazare on criticism on sharad pawar | “स्वयंघोषित गांधी २०१४ नंतर गायब, खरे गांधीवादी असते तर...”; रोहित पवारांची अण्णा हजारेंवर टीका

“स्वयंघोषित गांधी २०१४ नंतर गायब, खरे गांधीवादी असते तर...”; रोहित पवारांची अण्णा हजारेंवर टीका

Rohit Pawar Replied Anna Hazare: अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र गटाचे प्रमुख शरद पवार यांनी अण्णा हजारेंवर टीका केली होती. या टीकेला अण्णा हजारेंनी प्रत्युत्तर दिले. हा पलटवार करताना अण्णा हजारेंनी शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवरून अण्णा हजारेंना प्रत्युत्तर देताना खोचक शब्दांत हल्लाबोल केला आहे.

एका मुलाखतीत बोलताना शरद पवार म्हणाले होते की, माझ्याविरोधात ट्रकभर पुरावे असल्याचा दावा तत्कालीन उपायुक्त खैरनार आणि अण्णा हजारे यांनी केला होता. या आरोपांची चौकशी झाली होती. या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे पुराव्यांनीशी समोर आले होते. त्यानंतर आता माझ्यावर आरोप करणारे खैरनार आणि अण्णा हजारे यांचे काय झाले? ते आज कुठे आहेत?, अशी विचारणा शरद पवारांनी केली होती. यावर, १० ते १२ वर्षांनंतर शरद पवारांना जाग आली आहे. अचानक जाग कशी आली माहिती नाही. त्यावेळी केलेल्या आंदोलनामुळे शरद पवार यांचे अनेक मंत्री घरी गेले होते. तसेच शरद पवारांचे नातेवाईक असलेले पद्मसिंह पाटील यांच्याविरोधातही आंदोलन केले होते. कदाचित त्याचा राग त्यांना असावा. म्हणून त्यांनी माझ्यावर टीका केली, असे उत्तर अण्णा हजारेंनी दिले होते. 

जेष्ठ म्हणून आदर आहेच पण गांधीवादाचा मुखवटा लावून...

अण्णा हजारेंनी केलेल्या टीकेला रोहित पवार यांनी एक्सवर प्रत्युत्तर दिले आहे. २०१४ पूर्वी प्रत्येक विषयावर आंदोलन करणारे, प्रतिक्रिया देणारे तथाकथित  स्वयंघोषित गांधी २०१४ नंतर मात्र देशात एवढ्या मोठ्या घडामोडी घडत असताना आणि लोकशाही शेवटच्या घटका मोजत असतानाही शांतच राहिले नाही तर गायब झाले. खरे गांधीवादी असते तर संविधानाशी छेडछाड पासून ते मणिपूर अत्याचार, कुस्तीपटू आंदोलन, इलेक्टोरल बाँड घोटाळा अशा प्रत्येक प्रकरणावर गप्प न बसता बोलले असते, लढले असते. असो! जेष्ठ म्हणून आदर आहेच पण गांधीवादाचा मुखवटा लावून सोयीची आंदोलने करून जनतेच्या भावनांशी खेळणे मात्र योग्य नाही, या शब्दांत रोहित पवारांनी हल्लाबोल केला.

दरम्यान, शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माझ्यावर टीका केली होती. प्रत्येक पक्षात समविचारी माणसे असतात, तसेच शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड हे समविचारी लोक आहेत, ते एकत्र राहणारच, असा खोचक टोलाही अण्णा हजारेंनी लगावला होता.


 

Web Title: ncp sp group Rohit pawar replied anna hazare on criticism on sharad pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.