“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 16:43 IST2025-10-03T16:43:09+5:302025-10-03T16:43:40+5:30
NCP SP Group Leader Rohit Patil News: आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तासगावचे आमदार असलेल्या रोहित पाटलांना मुंबईतील गरबा आठवल्याची कुजबुज राजकीय वर्तुळात आता सुरू झाली आहे.

“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
NCP SP Group Leader Rohit Patil News: राज्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात पावसाळा गृहीत धरला जातो. त्यानुसार सरासरी १००४ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा प्रत्यक्षात या चार महिन्यांमध्ये १०९१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, सरासरीच्या हे प्रमाण १०८ टक्के इतके आहे. सर्वाधिक १६४ टक्के पाऊस सप्टेंबरमध्ये झाला असून, गेल्या वर्षी याच महिन्यात ११६ टक्के पाऊस झाला होता. ऑगस्ट व सप्टेंबरमधील पावसामुळे राज्यातील सुमारे ६० लाख हेक्टरहून अधिक क्षेत्राचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी संकटात सापडला आहे. यातच राज्यातील अतिवृष्टी, शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होत आहेत.
शेतकरी कर्जमाफी, ५० हजार हेक्टरी मदत, ओला दुष्काळ जाहीर करावा, अशा मागण्या विरोधकांनी लावून धरल्या आहेत. यातच दसरा मेळावा, त्यावर होणारे खर्च आणि ते खर्च शेतकऱ्यांना मदत म्हणून देणे, यावरूनही आरोप-प्रत्यारोप झालेले पाहायला मिळाले. यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि तासगावचे आमदार रोहित पाटील यांनी मुंबईतगरबा, दांडियावर झालेल्या खर्चावर बोट ठेवत ते पैसे शेतकऱ्यांना दिले असते, असे म्हटले आहे. आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोहित पाटलांना मुंबईतीलगरबा आठवल्याची कुजबुज राजकीय वर्तुळात आता सुरू झाली आहे.
रोहित पाटलांचे लक्ष मुंबईच्या गरब्यावर
अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल आहे. तर दुसरीकडे मुंबई, ठाण्यात गरबा-दांडियानिमित्त रोषणाईसाठी कोट्यवधी रुपये उधळले जात आहेत. शुभेच्छा बॅनरांनी चौक चौक रंगले आहेत. या अहमीकेत कोणताच प्रमुख राजकीय पक्ष मागे नाही. तासगावचे आमदार रोहित पाटील यांनी यावर बोट ठेवले. गरबा इव्हेंट्समध्ये सेलिब्रिटींना बोलावून त्यांच्यावर लाखोंची उधळण करण्यापेक्षा ते शेतकऱ्यांसाठी खर्च करता आले असते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. कदाचित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांचा हा मुद्दा महत्त्वाचा ठरेल.
दरम्यान, राज्यातील अतिवृष्टीग्रस्त व पूरग्रस्तांना आठ दिवसांत सर्वसमावेशक मदत जाहीर केली जाईल आणि मदतीची रक्कम दिवाळीच्या आत बँक खात्यात जमा करण्याचा प्रयत्न असेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्यात सुमारे ६० लाख हेक्टरचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे, अशी माहिती त्यांनी दिली.