हवामान विभागाने रायगडसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी केल्यानंतर जिल्हाधिकारी किशन एन. जावळे यांनी सहा तालुक्यातील शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केली. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागांत नद्यांना पूर आल्याने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला. शिवाय, नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला.
रायगड जिल्ह्यातील माणगाव, तळा, रोहा, पाली, महाड आणि पोलादपूर तालुक्यात सतत पाऊस सुरू आहे. त्यामुळे नद्यांना पूर आला असून कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. याच पार्श्वभूमीवर माणगाव, रोहा आणि महाडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या अहवालांवरून आणि स्थानिक परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर जिल्हा प्रशासनाने माणगाव, तळा, रोहा, पाली, महाड आणि पोलादपूर अशा सहा तालुक्यातील शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्टसिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक भागांत सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट जारी केला. दरम्यान, गेल्या २४ तासांत दोडमार्ग मध्ये १२३ मिमी, सावंतवाडी ११४ मि.मी पावसाची नोंद झाली. तर, गेल्या १४ तासांपासून कुडाळ मधील माणगाव खोऱ्यातील २५ गावातील वीजपुरवठा बंद आहे.
किनारपट्टी भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारारायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे किनारपट्टी भागातील नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.