31 Jan, 26 10:12 PM
"...सुनेत्रा काकींच्या रुपात आम्ही तिथं अजितदादांना पाहू", रोहित पवार झाले भावूक
सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर याबद्दल बोलताना आमदार रोहित पवार भावूक झाले. "राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा काकी यांनी शपथ घेतली, याचा आनंद आहे. खरं म्हणजे अजितदादांची जागा कुणीच घेऊ शकत नाही, पण किमान सुनेत्रा काकींच्या रुपात तरी आम्ही तिथे अजितदादांना पाहू. डोक्यावर डोंगराएवढं दुःख असताना आणि आम्ही सर्वजण शोकाकूल असताना त्यांना शुभेच्छा तरी कशा द्याव्यात, हे कळत नाही", असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
31 Jan, 26 09:58 PM
राज ठाकरे यांची प्रफुल पटेलांवर टीकास्त्र
"महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात पार विचका झाला आहे त्यावर खरंतर भाष्य पण करावं असं वाटत नाही. पण तरीही आज दिवसभर ज्या घडामोडी सुरु आहेत त्यावर बोलावंच लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा पण पटेल नाही", अशा शब्दात राज ठाकरे यांनी प्रफुल पटेल यांना सुनावले आहे.
31 Jan, 26 09:09 PM
"त्याच घरातील कर्तृत्ववान स्त्री आज राज्याची सूत्रे हाती घेत आहे", छगन भुजबळांची पोस्ट
"हा शपथविधी महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील एका नव्या पर्वाचा प्रारंभ आहे असे मी मानतो. स्व. अजितदादांच्या जीवनात सुनेत्रावहिनींचे योगदान आम्ही पहिले आहे. शांत स्वभाव पण तितकाच कणखर व निश्चयी बाणा ही त्यांची खरी ओळख. ज्या पवार कुटुंबाने राज्याला प्रदीर्घ काळ नेतृत्व दिले, त्याच घरातील कर्तृत्ववान स्त्री आज राज्याची सूत्रे हाती घेत आहे, ही खरोखर अभिमानाची बाब आहे", असे छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पदाची शपथ घेतल्यानंतर म्हटले आहे.
31 Jan, 26 08:18 PM
अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना कामासाठी दिल्या शुभेच्छा
"महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल श्रीमती सुनेत्रा पवार जी यांचे हार्दिक अभिनंदन. अजित पवार जी आयुष्यभर शेतकऱ्यांचे कल्याण, महिला सक्षमीकरण आणि समाजातील प्रत्येक घटकाच्या उन्नतीसाठी समर्पित होते. मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही त्यांचे कार्य पुढे घेऊन जाणार आणि महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती द्याल", अशा शब्दात अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा दिल्या.
31 Jan, 26 07:46 PM
"अजितदादांनी आयुष्यभर...", सुनेत्रा पवारांची उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पदाची शपथ घेतल्यानंतर आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, ""आदरणीय अजितदादांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि वंचित घटकांसाठी जगण्याचा मंत्र दिला. आज त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत ‘शिव-शाहू-फुले-आंबेडकर’ यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून कर्तव्य भावनेने उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारताना मन अक्षरशः भरून येत आहे."
"दादांच्या अकाली जाण्याने मनावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला असला, तरी त्यांनी शिकवलेली कर्तव्यनिष्ठा, संघर्षाची ताकद आणि जनतेप्रतीची बांधिलकी हाच माझा खरा आधार आहे. त्यांच्या स्वप्नातील न्यायप्रिय, समताधिष्ठित आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी अखंड प्रामाणिकपणे काम करत राहीन. या कठीण क्षणी महाराष्ट्रातील जनतेने दिलेला प्रेमाची साथ हेच माझे बळ आहे. आपल्या विश्वासाच्या जोरावर, दादांच्या विचारांना उजाळा देत, नव्या आशेने पुढे चालत राहीन", अशा भावना उपमुख्यमंत्री पवार यांनी व्यक्त केल्या.
31 Jan, 26 07:23 PM
सुनेत्रा पवारांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार
उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सुनेत्रा पवारांचे अभिनंदन केले. सुनेत्रा पवारांनीही मोदींचे आभार मानले आहेत.
"आपण दिलेला आशीर्वाद माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. महाराष्ट्राच्या सेवेसाठी नव्या जबाबदारीची सुरुवात करताना आपल्या शब्दांनी जनकल्याणाच्या कामासाठीचा आत्मविश्वास वाढला. राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी प्रामाणिकपणे, समर्पित भावनेने कार्य करण्याचा संकल्प यामुळे अधिक बळकट झाला आहे. आपल्या विश्वासाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद", अशा भावना सुनेत्रा पवार यांनी मोदींचे आभार मानताना व्यक्त केल्या आहेत.
पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, "महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ सुरू करणाऱ्या सुनेत्रा पवार जी यांना शुभेच्छा. मला विश्वास आहे की त्या राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी अथक परिश्रम करतील आणि दिवंगत अजितदादा पवार यांचे स्वप्न पुढे नेतील."
31 Jan, 26 07:08 PM
सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होताच प्रफुल पटेलांची पोस्ट, अजित पवारांचे स्मरण करत म्हणाले...
सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या शपथविधीनंतर प्रफुल पटेलांनी एक पोस्ट करत म्हटले आहे की, "आमचे नेते अजितदादांच्या आकस्मिक निधनामुळे महाराष्ट्रासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कधीही न भरून निघणारी हानी झाली. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी शब्दांत व्यक्त करता येणार नाही. मात्र सुनेत्रा वहिनी पवार यांनी आपले वैयक्तिक दु:ख बाजूला ठेवून, दादांच्या विचारांना आणि कार्याला पुढे नेण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. अजितदादांच्या विकासदृष्टीला त्याच वेगाने आणि ठामपणाने पुढे नेत, महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी त्या समर्पितपणे कार्य करतील, हा दृढ विश्वास आहे."
31 Jan, 26 06:43 PM
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडील खाती ठरली
पमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा पार पडला. सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. राजभवनात झालेल्या दिमाखदार सोहळ्यात राज्यपालांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्या आहेत. दरम्यान. आता सुनेत्रा पवार यांना कोणती खाती मिळणार या चर्चा सुरू होत्या. पवार यांना तीन खाती मिळाली आहेत. यामध्ये राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्यक विकास ही खाती मिळाली आहेत.
31 Jan, 26 05:56 PM
राज्याच्या मुख्यमंत्रीपदीही एक महिला असावी : छगन भुजबळ
"सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. माझी अशीही इच्छा आहे की, राज्याच्या मुख्यमंत्रीपदीही एक महिला असावी," असे महाराष्ट्राचे मंत्री छगन भुजबळ म्हणाले.
31 Jan, 26 05:15 PM
सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली; राज्यात पहिली महिला उपमुख्यमंत्री
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
31 Jan, 26 04:52 PM
सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार; राजभवनात तयारी सुरू
राजभवनामध्ये आजच सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. राजभवनामध्ये तयारी सुरू आहे.
31 Jan, 26 04:14 PM
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गटनेता निवडीचे पत्र सादर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गटनेता निवडीचे पत्र सादर करण्यात आले. यावेळी मंत्री हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, खासदार सुनिल तटकरे, आमदार धनंजय मुंडे उपस्थित होते.
31 Jan, 26 03:36 PM
आजच शपथविधी व्हावा अशी विनंती केली- सुनील तटकरे
सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेत्या म्हणून निवड झाली आहे. आम्ही आजच शपथविधी समारंभ व्हावा अशी विनंती केली आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले.
31 Jan, 26 03:26 PM
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विधिमंडळात बैठक सुरू
मुंबई- विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक सुरू आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार व इतर नेते येथे उपस्थित आहेत.
31 Jan, 26 02:59 PM
माणसापेक्षा खुर्चीला जास्त महत्त्व'- संजय शिरसाट
पमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अजितदादांवर अंत्यसंस्कार होऊन अवघे ४ दिवस उलटत नाही, तोच त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावर मंत्री संजय शिरसाट यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली. “दुखवटा संपण्याआधीच शपथविधी होतोय. राजकारणात माणसापेक्षा खुर्चीला जास्त महत्त्व दिलं जात असल्याचं दिसतं,” अशी भावना त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
31 Jan, 26 02:44 PM
अजितदादांच्या रिक्त जागेवर सुनेत्रा 'वहिनीं'ची निवड
सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड; राष्ट्रवादी आमदारांनी एकमताने मान्य केला ठराव
31 Jan, 26 02:17 PM
"तो सर्वस्वी पक्षाचा, कौटुंबिक निर्णय!"
"अजित पवारांचा पक्ष हा स्वतंत्र गट आहे. त्यामुळे शरद पवार जे बोलत आहेत, ते सत्य आहे, सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रिपदाविषयी कुणालाच काही माहिती नाही. अजितदादांच्या कुटुंबातील कोणी भाजपाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री होणार असेल तर हा सर्वस्वी त्यांच्या पक्षाचा आणि कौटुंबिक विषय आहे. कोणी त्यावर मत व्यक्त करण्याची ही अजिबात वेळ नाही" - शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत
31 Jan, 26 02:15 PM
राष्ट्रवादीत सगळं इतकं झटपट का होतंय?
सुनेत्रा पवार यांची तातडीने उपमुख्यमंत्रिपदी निवड करण्याचा निर्णय का घेतला गेला? ही आहेत ५ कारणे
31 Jan, 26 01:15 PM
Mumbai Local Mega Block: मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक
मध्य रेल्वेच्या ठाणे-कल्याण स्थानकांदरम्यान अप व डाऊन जलद मार्गावर रविवारी सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० दरम्यान मेगाब्लॉक असेल. परिणामी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या जलद लोकल ठाणे ते कल्याण दरम्यान डाऊन धीम्या मार्गावरून वळविण्यात येतील.
31 Jan, 26 01:18 PM
हार्बर मार्गावर रविवारी प्रवास करणार असाल तर...
हार्बरवर कुर्ला-वाशी स्थानकांदरम्यान सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. त्यामुळे सीएसएमटी ते वाशी / बेलापूर / पनवेल दरम्यान फेऱ्या बंद राहातील. परंतु सीएसएमटी – कुर्ला व पनवेल – वाशीदरम्यान विशेष उपनगरीय लोकल सेवा चालविण्यात येतील.
31 Jan, 26 12:36 PM
अजितदादांची आग्रहाची भूमिका होती की, जे झाले ते विसरूया, आणि...
"साहेबांच्या देखत त्यांना दोन्ही पक्ष एकत्रित करायचे आहेत, अशी अजित पवारांची इच्छा होती. माझ्याबद्दल जनमानसात जे आहे ते सगळं पुसून मी साहेबांसोबत पुन्हा एकत्र यायला तयार आहे, असं ते म्हणायचे. विलीनीकरणाबाबत त्यांचा आग्रह होता. त्यामुळे एकदा नव्हे तर ८ ते १० वेळा आमच्यासोबत त्यांच्या बैठका झाल्या. बैठकीचं ठिकाण माझे घरच होते. पहिल्या दोन-चार बैठकांत त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. जे झाले ते विसरूया, आपण सगळे एक होऊन राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढवूया ही अजितदादांची अंतिम आणि तीव्र आग्रहाची भूमिका होती"- जयंत पाटील
31 Jan, 26 12:13 PM
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत नेमकं काय-काय ठरलं होतं?
"अजित पवारांची जी अंतिम इच्छा होती, ती पूर्ण करण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस बांधील आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणे हा राजकीय स्वार्थ नव्हता. प्रत्येक पक्षाला त्यांचा निर्णय घ्यायचा होता. विलीनीकरणाबाबत १०० टक्के चर्चा झाली होती. नगरपालिका निवडणुकीनंतर या चर्चांना वेग आला. सुरुवातीला जयंत पाटील यांच्यासोबत २- ३ वेळा चर्चा झाल्या. त्यानंतर लगेच महापालिका निवडणुका आल्या त्यामुळे चर्चेत अडथळे येत होते. मात्र जिल्हा परिषद निवडणुका लागल्या नसत्या तर विलीनीकरण अगोदरच झाले असते. मात्र जिल्हा परिषद निवडणुका एकत्र लढवायच्या हे ठरले. त्यानंतर निकालानंतर दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण करायचे हे ठरले होते" - प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे
31 Jan, 26 11:45 AM
१७ जानेवारी २०२६ च्या बैठकीचा व्हिडीओ समोर; दोन राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची झाली होती चर्चा, शरद पवारही होते उपस्थित
31 Jan, 26 11:35 AM
शरद पवार कापऱ्या स्वरात म्हणाले, “आज अजित असता तर...”
पुतण्याबद्दल बोलताना काका झाले हळवे; कापऱ्या स्वरात शरद पवार म्हणाले, “आज अजित असता तर...”
31 Jan, 26 10:33 AM
शरद पवारांची संपूर्ण पत्रकार परिषद...
31 Jan, 26 10:31 AM
आता दोन राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाचं काय?
"एकत्र येण्याच्या सगळ्या चर्चेत मी नव्हतो. अजित पवार, जयंत पाटील बैठका घेत होते. दुर्दैवाने त्यामध्ये आता खंड पडेल असं चित्र दिसतेय. प्रफुल्ल पटेल, तटकरे पक्षाचे प्रमुख आहेत आणि त्यांना अधिकार आहे. काय करायचं आहे ते त्यांनी ठरवलेलं दिसत आहे. यावर मी भाष्य करणार नाही"- शरद पवार
31 Jan, 26 10:25 AM
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत शरद पवार म्हणाले...
"सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीची मला काहीच माहिती नाही. सुनेत्रा पवार शपथ घेणार हे वाचनात आलं आहे. त्यांच्या पक्षाने तो निर्णय घेतलेला दिसतोय. हा पूर्णपणे त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे."
31 Jan, 26 10:22 AM
"स्पष्ट बहुमत असतानाही घाई का?"
"या सरकारजवळ स्पष्ट बहुमत आहे. बहुमताच्या पार पलिकडे हे सरकार आहे. या सरकारला कुठल्याही प्रकारचा धोका नाही. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये त्यांना पुढे जाण्याची घाई का आहे, याबद्दल मी काही बोलू शकत नाही" - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ
31 Jan, 26 10:09 AM