09 Feb, 26 09:43 PM
हवेली पंचायत समितीची सत्ता कुणाकडे? तालुक्याचे लक्ष; जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे वर्चस्व
उरुळी कांचन : हवेली तालुका पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून पंचायत समितीतील सत्तेच्या चाव्या अपक्ष सदस्यांच्या हाती गेल्या आहेत. एकूण १२ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) सर्वाधिक ६ जागा, भाजपाला ४ जागा, शिवसेना शिंदे गटाला १ जागा तर १ जागा अपक्ष उमेदवाराने पटकावली आहे. बहुमताचा आकडा ७ असताना कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने पंचायत समितीतील सत्तास्थापनेत अपक्ष सदस्य निर्णायक ठरणार की कोण याकडे लक्ष लागले आहे.
09 Feb, 26 09:12 PM
दौंड जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीची बाजी, पंचायत समितीत भाजप विजयी
दौंड जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीने (अजित पवार) सात पैकी सहा जागा जिंकून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात निर्विवादपणे विजय मिळवला तर पंचायत समिती गणात १४ पैकी आठ जागांवर भाजपने विजय मिळवला. दरम्यान दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी निकालानंतर एकच जल्लोष केला.
09 Feb, 26 07:38 PM
धाराशिवमध्ये महायुतीचा धमाका! ५५ पैकी ४० जागा जिंकल्या
धाराशिव जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला असून, जिल्ह्याच्या 'मिनी मंत्रालया'वर महायुतीने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत महायुतीच्या घटकपक्षांनी ५५ पैकी तब्बल ४० जागांवर विजय मिळवत सत्ता काबीज केली आहे. दुसरीकडे, काँग्रेस आणि उद्धवसेनेच्या महाविकास आघाडीला केवळ १० जागांवर समाधान मानावे लागले असून, त्यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे.
09 Feb, 26 07:22 PM
२२ वर्षाच्या मृणाल पाटील यांनी मैदान मारलं!
सातारा जिल्हा परिषदेच्या ६५ जागांसाठी निवडणूक झाली. आज (९ जानेवारी) निकाल जाहीर झाले. यात मंद्रुळकोळे जिल्हा परिषद गटात माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांना झटका बसला. नरेंद्र पाटील यांच्या पत्नी प्राची पाटील यांचा पराभव झाला. शिंदेसेनेकडून निवडणूक लढवत असलेल्या २२ वर्षीय मृणाल पाटील यांनी विजयाचा गुलाल उधळला.
09 Feb, 26 06:58 PM
लातुरात देशमुखांना धक्का!
लातूर जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल आले आहेत. २०१७ च्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपाला यावेळी चांगले प्रदर्शन करता आले नाही. २०१७ मध्ये ३६ जागा जिंकणाऱ्या भाजपाला अवघ्या १८ जागांवरच समाधान मानावं लागलं आहे. पण, दुसरीकडे काँग्रेस २३ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, पण सत्तेसाठी लागणारे आकडे जुळवणे कठीण आहे. त्यामुळे महायुतीतीच सत्ता जिल्हा परिषद येणार हे स्पष्ट झाले आहे.
09 Feb, 26 06:12 PM
अजित पवारांचा उमेदवार ठरला जायंट किलर! निकालाने कोल्हापूरच्या राजकारणात खळबळ
कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. यातील एका निकालाने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. गोकुळचे माजी चेअरमन विश्वास आबाजी पाटील यांचे सुपुत्र सचिन पाटील यांचा पराभव झाला आहे.
पाडळी खुर्द गटातून सचिन पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे राजू सूर्यवंशी हे निवडणुकीच्या रिंगणात होते. सूर्यवंशी यांनी दणदणीत विजय मिळवला. हा निकाल गोकुळमधील एका वर्चस्व असणाऱ्या घराण्याला धक्का असल्याचे मानले जात आहे.
09 Feb, 26 06:01 PM
शरद पवारांची प्रकृती का बिघडली? रोहित पवारांनी दिली माहिती
शरद पवार यांना पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या उपचार सुरू करण्यात आले असून, आमदार रोहित पवार यांनी प्रकृतीबद्दल माहिती दिली.
"गेल्या काही दिवसांपासून त्यांचे शारीरिक परिश्रम होत आहेत. काही दिवसांपासून त्यांना हा त्रास जाणवत होता. थकवा आला होता. ते सध्या अतिदक्षता विभागात नाही, तर खासगी रुममध्ये आहेत. पुढील १ ते २ दिवसांमध्ये त्यांना सुट्टी मिळेल आणि ते मुंबईला जातील", असे रोहित पवार म्हणाले.
09 Feb, 26 05:57 PM
महापालिकेनंतर कोल्हापूर जिल्हा परिषदेवर महायुतीचीच सत्ता
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ६८ पैकी ५१ जागी महायुतीचे उमेदवार निवडून आले आहेत. जर महायुतीमध्येच काही वांदे झाले नाही तर जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता नक्की आहे. सर्वाधिक २० जागा मिळवून मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार पक्षाने स्थापनेपासूनची उच्चांकी कामगिरी नोंदवली. आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली १४ जागा जिंकून कॉंग्रेस दुसऱ्या स्थानावर राहिली.
09 Feb, 26 05:10 PM
१२ पैकी कुणी जिंकल्या सर्वाधिक जिल्हा परिषदा? कुणाचे वाजले १२?
राज्यातील १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत भाजपाने सर्वाधिक सात जिल्हा परिषदांवर 'कमळ' फुलवलं आहे. शिंदेसेना आणि राष्ट्रवादीने (अजित पवार गट) दोन जिल्हा परिषदांवर आपला झेंडा फडकवला आहे, तर शरद पवार गटानं सांगली जिल्हा परिषद जिंकलीय. काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या पदरी भोपळा पडला आहे.
09 Feb, 26 04:54 PM
पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
एकूण जागा - ७३
निकाल जाहीर - ६९
राष्ट्रवादी - ४८
भाजप - १०
ठाकरे गट - ६
शिवसेना - ४
शरद पवार गट - १
काँग्रेस - ०
अपक्ष - ०
09 Feb, 26 04:51 PM
नेत्यांच्या नातेवाईकांचा विजय असो!
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी प्रमुख राजकीय नेत्यांच्या नातेवाईकांना तिकीट देण्यात आलं होतं. त्यापैकी बहुतांश उमेदवारांनी विजयाचा झेंडा फडकवला, तर काही ठिकाणी मतदारांनी घराणेशाही नाकारली. (वाचा संपूर्ण बातमी)
09 Feb, 26 04:48 PM
लातूर जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस अव्वल, पण सत्ता महायुतीचीच; काय लागला निकाल?
लातूर जिल्हा परिषद निवडणूक निकालात महाविकास आघाडीला झटका बसला आहे. २०१७ च्या निवडणुकीत ३६ जागा जिंकणाऱ्या भाजपाला आतापर्यंत १८ जागांवरच विजय मिळवता आला आहे. तर गेल्यावेळी १५ जागांपर्यंत मजल मारणाऱ्या काँग्रेसने आतापर्यंत २३ जागांवर विजय मिळवला आहे.
लातूर जिल्हा परिषदेच्या ५९ जागांपैकी ५७ जागांचे निकाल जाहीर झाले असून, भाजपाने १८, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) ११ आणि शिंदेसेनेने १ जागा जिंकली आहे. बहुमतासाठी लागणारा ३० जागांचा आकडा महायुतीला मिळाला आहे.
09 Feb, 26 04:45 PM
शरद पवार हेल्थ अपडेट्स...
खोकला आणि श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानं ज्येष्ठ नेते शरद पवार यांना रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी केलेल्या तपासणीनुसार, त्यांच्या हृदयाचे ठोके आणि ऑक्सिजन पातळी स्थिर आणि समाधानकारक आहे. श्वसनाचा वेग वाढलेला दिसत असून त्यावर उपचार सुरू झाले आहेत.
09 Feb, 26 03:50 PM
जिल्हा परिषद- कोल्हापूर
एकूण जागा - 68
आतापर्यंत 61 पक्षनिहाय विजयी झालेले उमेदवार.
भाजप - 12
शिवसेना (शिंदे) - 7
राष्ट्रवादी - 18
काँग्रेस - 13
शिवसेना (ठाकरे) - 1
जनसुराज्य - 5
स्वाभिमानी शेतकरी संघटना - 1
शाहू आघाडी राजेंद्र पाटील यड्रावकर गट – 4
इतर -
09 Feb, 26 03:15 PM
कोल्हापूरात आमदार राहुल आवाडे यांची कन्या सानिका आवाडे विजयी
कोल्हापुरातील आमदार राहुल आवाडे यांची कन्या सानिका आवाडे विजयी झाल्या आहे. सानिकाच्या विजयामुळे आता आवाडे कुटुंबियांची चौथी पिढी ही राजकारणात आली आहे.
09 Feb, 26 03:10 PM
सातारा जिल्ह्यात भाजप सत्तेच्या दिशेने ! ३२ जागांवर आघाडी : जोरदार मुसंडी पण, ग्रामविकास मंत्र्यांना तालुक्यातच धक्का
सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपने ३२ जागांवर आघाडी घेतली असल्याने सत्तेच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. पण, ३३ जागा जिंकल्यासच मिनीमंत्रालयावर पक्षाचा झेंडा फडकणार आहे. अन्यथा राष्ट्रवादी काॅंग्रेस किंवा शिंदेसेनेची मदत भाजपला घ्यावी लागेल. तर माण तालुक्यात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना धक्का बसला आहे. पाचपैकी दोन गटच ताब्यात घेता आले आहेत. तसेच जिल्ह्यातील या निवडणुकीत भाजपने प्रथमच मुसंडीही मारल्याचे दिसून आले आहे.
09 Feb, 26 03:01 PM
भाजपा दोनशे पार, शिवसेना १२०; राज्यात महायुतीचा विजय
राज्यात भाजपाला मोठं यश मिळाले आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार, जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाने २०८ जागांचा आकडा पार केला आहे. शिवसेना १२०, राष्ट्रवादी १२६, काँग्रेस ४६, ठाकरे सेना ३८, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार १९ इतर ३१ असे निकाल समोर आले आहेत.
09 Feb, 26 02:58 PM
जालना महापालिकेत भाजपाचा विजय; वंदना मगरे प्रथम महापौर, राजेश राऊत उपमहापौर
जालना महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवडणूक आज पार पडली. अधिकृतपणे प्रथम महापौर वंदना मगरे तर उपमहापौर राजेश राऊत विराजमान झाले. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, आमदार बबनराव लोणीकर, आमदार नारायण कुचे, माजी आमदार व भाजप नेते कैलास गोरंट्याल यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पदभार स्वीकारण्यात आला.
09 Feb, 26 02:09 PM
पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सत्ता
एकुण जागा - ७३ पैकी ५५ जागा निकाल
भाजप- ८
शिवसेना- ४
राष्ट्रवादी- ३९
शरद पवार गट - १
ठाकरे गट- ३
काँग्रेस-०
अपक्ष ०
बहुमत ३७ चा आकडा केला पार
09 Feb, 26 02:09 PM
गोकुळचे माजी चेअरमन विश्वास आबाजी पाटील यांचे चिरंजीव सचिन पाटील यांचा पराभव
गोकुळचे माजी चेअरमन विश्वास आबाजी पाटील यांचे चिरंजीव सचिन पाटील यांचा पराभव झाला आहे. पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदार संघामधून सचिन पाटील होते उमेदवार. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू सूर्यवंशी यांचा विजय. गोकुळच्या एका माजी अध्यक्षची मुलगी विजयी तर दुसऱ्या माजी अध्यक्षाचा मुलगा पराभूत. अरुण डोंगरे यांची कन्या अमृता डोंगळे विजयी. तर विश्वास आबाजी पाटील यांचे चिरंजीव सचिन पाटील यांचा पराभव झाला आहे.
09 Feb, 26 01:51 PM
जत तालुक्यात भाजपचा झेंडा;विरोधकांची आघाडी निष्प्रभ
जत : जत तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत यश मिळवत राजकीय समीकरणे बदलून टाकली आहेत. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) हे सर्व प्रमुख पक्ष एकत्र आले होते. मात्र, या संयुक्त आघाडीला भाजपने जोरदार धक्का देत ९ जिल्हा परिषद गटापैकी चक्क ८ गटांवर विजय मिळवला. पंचायत समितीच्या १८ जागांपैकी भाजप १२, राष्ट्रवादी अजित पवार गट २, काँग्रेसला चार जागा मिळाल्या आहेत.
09 Feb, 26 01:47 PM
कोल्हापूर जिल्हा परिषद दुपारी दीडपर्यंतचा निकाल
कोल्हापूर जिल्हा परिषद दुपारी दीडपर्यंतचा निकाल
एकूण जाहीर निकाल ३४
कॉंग्रेस ०८
भाजप ०७
राष्ट्रवादी ०६
शिंदेसेना ०६
यड्रावकर शाहू आघाडी ०४
जनसुराज्य ०२
अपक्ष ०१
एकूण ३४
09 Feb, 26 01:43 PM
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तुळस जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपाच्या बंडखोर सुजाता पडवळ विजयी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तुळस जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपाच्या बंडखोर सुजाता पडवळ विजयी झाल्या. पडवळ यांनी शिंदेसेनेच्या योगिता परब यांचा पराभव केला.
09 Feb, 26 01:32 PM
कागल तालुक्यात भाजपाला आणि राष्ट्रवादीला मोठे यश
नानीबाई चिखली - शिवानी भोसले भाजप
सिद्धनेर्ली - सुयशा घाटगे- भाजप
म्हाकवे - काकासाहेब सावडकर भाजप
कसबा सांगाव- सुवर्णा कांबळे (राष्ट्रवादी)
बोरवडे शोभाताई फराकटे( राष्ट्रवादी)
सेनापती कापशी -
शिल्पा खोत (राष्ट्रवादी)
09 Feb, 26 01:08 PM
सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्धवसेनेनं खातं उघडलं, विजय नाईक यांनी मिळवला विजय
सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्धवसेनेनं खातं उघडलं, विजय नाईक यांनी मिळवला विजय. माजी जिल्हा परिषद अध्यक्षा आणि महायुती समर्थित अपक्ष उमेदवार समिधा नाईक यांचा केला पराभव
09 Feb, 26 12:58 PM
उद्धवसेनेची सांगली जिल्हा परिषदेत ‘एंट्री’
सांगली : शिवसेनेच्या विभाजनानंतर पहिल्याच निवडणुकीत उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख अभिजीत पाटील यांनी चिकुर्डे गटात विजय मिळवला. महापालिका आणि नगरपालिका निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर जिल्हा परिषदेत उद्धवसेनेने चंचूप्रवेश मिळवल्याचे दिसून येत आहे.
09 Feb, 26 12:52 PM
सावंतवाडीतील माजगाव जिल्हा परिषद गटातून भाजपाचे विक्रांत सावंत विजयी
सावंतवाडी तालुक्यातील माजगाव जिल्हा परिषद गटातून भाजपाचे विक्रांत सावंत विजयी, विक्रांत सावंत यांनी मोठ्या मताधिक्याने मिळवला विजय
09 Feb, 26 12:44 PM
जिल्हा परिषदेच्या ४६१ पैकी भाजपाने १७० जागांवर घेतली आघाडी
राज्यात १२ जिल्हा परिषदांसाठी निवडणुका पार पडल्या. यामध्ये ४६१ जागांसाठी निवडणूक झाली. १२.४० मिनिटांपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार, भाजपाने १७० जागा, तर शिवसेना-९८, राष्ट्रवादी-९२, काँग्रेस -३७, ठाकरे सेना-२४, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार-१६ आणि इतर २४ जागांवर आघाडीवर आहेत.
09 Feb, 26 12:40 PM
कोल्हापूरमध्ये जाहीर जागांमध्ये सर्वाधिक कॉंग्रेसला महायुतीला १३ जागा
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ६८ जागांपैकी १९ जागांचे अधिकृत तिकाल जाहीर झाले असून सर्वाधिक ६ जागा कॉंग्रेसने जिंकल्या आहेत. त्याखालोला राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपने प्रत्येकी ४ ठिकाणी विजय मिळवला असून शिंदेसेना ३ जागांवर विजयी झाली आहे. जनसुराज्यनेही दोन जागांवर गुलाल उधळला आहे.
09 Feb, 26 12:35 PM
बारामती पंचायत समितीत भाजपची सरशी; शिरसुफळ व सुपेत विजय
शिरसुफळ पंचायत समिती गणातून भाजपचे उमेदवार अनिकेत बाळासाहेब गावडे विजयी ठरले आहेत. सुपे पंचायत समिती गणातून भाजपच्या उमेदवार उज्वला पोपट खैरे विजयी झाल्या आहेत. स्वर्गीय अजित पवार यांनी भाजपसाठी सुपे पंचायत समिती गणासह दोन जागा सोडल्या होत्या. त्या दोन्ही जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत.
09 Feb, 26 12:31 PM
कोडोलीत विनय कोरेंच्या उमेदवाराचा विजय
कागल तालुक्यातील नानीबाई चिखली जिल्हा परिषद मतदार संघातून शिवानी विजयसिंह भोसले विजयी
कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातून जनसुराज्य पुरस्कृत अमरसिंह पाटील विजयी
भुदरगड तालुक्यातील आकुर्डे जिल्हा परिषद मतदार संघात शिवसेनेच्या अर्चना कल्याण निकम विजयी
आकुर्डे पं. स - भाजपचे एकनाथ जाधव विजयी
कुर पं. स. शिवसेनेचे विक्रम पाटील विजयी
09 Feb, 26 12:29 PM
खानापूर तालुक्यात शिंदेसेनेचा भाजपला धक्का
विटा : खानापूर तालूक्यात भाजप विरुद्ध शिंदेसेना अशी थेट लढत होती. खानापूरचे शिंदेसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी भाजप नेत्यांना धक्का दिला आहे. पाचव्या फेरीअखेर शिंदेसेनेचे चारपैकी तीन गटातील तर आठपैकी सहा गणातील उमेदवार आघाडीवर आहेत. भाजप उमेदवार एका गटात तर दोन गणात आघाडीवर आहेत. अद्याप चार फेऱ्यांचे निकाल बाकी आहेत.
09 Feb, 26 12:12 PM
कवठेमहांकाळमध्ये राष्ट्रवादीची सरशी
सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे.
09 Feb, 26 11:58 AM
राज्यात १२ वाजेर्यंतच्या कलानुसार महायुतीचे उमेदवार आघाडीवर
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे कल समोर आले आहे. १२ वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार,जिल्हा परिषेदेत भाजपा- १४५, शिवसेना-९०, राष्ट्रवादी-८२, काँग्रेस -२९, ठाकरे सेना-२०, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार-०७ एवढ्या जागांवर आघाडीवर आहेत. तर कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसने आघाडी घेतल्याचे दिसत आहे.
09 Feb, 26 11:57 AM
रत्नागिरीमध्ये शिंदेसेनेची जोरदार मुसंडी
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मतमोजणीमध्ये शिंदेसेनेने जोरदार मुसंडी मागली असून, आतापर्यंत १७ जागांवर शिंदेसेनेने आघाडी घेतली आहे.
09 Feb, 26 11:50 AM
सिंधुदुर्गातील कोलगाव जिल्हा परिषद गटात भाजपाला धक्का, अपक्ष मायकल डिसोझा विजयी
सिंधुदुर्गातील कोलगाव जिल्हा परिषद गटात झालेल्या भाजपाला धक्का बसला आहे. कोलगावमध्ये अपक्ष मायकल डिसोझा विजयी झाले असून, भाजपाचे महेश सारंग यांचा पराभव
09 Feb, 26 11:45 AM
खानापूर, आटपाडी तालुक्यात शिंदेसेनेची जोरदार मुसंडी
सांगली: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत शिंदेसेनेने जोरदार मुसंडी मारल्याचे दिसत आहे. सहा फेऱ्यांचा निकाल हाती आला असून खानापूर तालुक्यातील चारही जिल्हा परिषद गट आणि आठ पंचायत समिती गणात शिंदेसेनेचे उमेदवार आघाडीवर आहेत. आटपाडी तालुक्यातही दिघंची आणि खरसुंडी जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणात शिंदेसेनेचेच उमेदवार आघाडीवर आहेत. खरसुंडी गट आणि गणातील उमेदवार विजय झाले आहेत.
09 Feb, 26 11:35 AM
काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांचा भाजपच्या देशमुख बंधुंना धक्का
सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील कडेपूर पंचायत समिती गण वगळता सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती गणात काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत. काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी नगरपालिका निवडणुकीप्रमाणेच मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीतही सरस कामगिरी केली असून एकत्र आलेल्या पृथ्वीराज देशमुख व संग्रामसिंह देशमुख या बंधुंना धक्का दिला आहे.
09 Feb, 26 11:29 AM
धाराशिवमधील ढोकी पंचायत समिती गणात अवघ्या एक मताने भाजप उमेदवाराचा पराभव
धाराशिव - ज़िल्हा परिषद व पंचायत समितीचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. ढोकी गटातील ढोकी पंचायत समिती गणात प्रचंड चुरशीची लढत झाली. यात भाजप उमेदवार निहाल काझी हे अवघ्या एक मताने पराभूत झाले. त्यांना 3186 मते मिळाली. तर, काँग्रेसचे विजयी उमेदवार अमर समुद्रे 3187 मते मिळवून विजयी झाले. दरम्यान, याच ढोकी गटातून उद्धवसेनेचे उमेदवार तीर्थराज घाडगे हे जवळपास 1200 मतांनी विजयी झाले आहेत.
09 Feb, 26 11:23 AM
माळशिरसमध्ये आमदार उत्तम जानकर यांना मोठा धक्का, मुलगा जीवन जानकर पराभूत
माळशिरसमध्ये आमदार उत्तम जानकर यांना मोठा धक्का बसला असून, जानकर यांचे पुत्र जीवन जानकर पराभूत झालले आहेत; तर माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी
संस्कृती राम सातपुते विजयी झाल्या आहेत.
09 Feb, 26 11:16 AM
सातारा जिल्हा परिषदेच्या मतमोजणीत भाजपाने घेतली आघाडी
सातारा जिल्हा परिषदेच्या मतमोजणीत भाजपाने घेतली आघाडी. जिल्हा परिषदेच्या ६५ जागांपैकी १८ जागांवर भाजपाने घेतली आघाडी
09 Feb, 26 11:13 AM
कोल्हापूरमध्ये आमदार विनय कोरे यांना बालेकिल्ल्यात धक्के
घुनकी बरोबर सातवे जिल्हा परिषद मतदार संघ आणि पंचायत समितीत जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे. घुनकीमध्ये काँग्रेसच्या शुभांगी कुंभार तर सातवेमध्ये राष्ट्रवादीचे डॉ. जयंत पाटील विजयी झाले आहेत. भादोले मतदार संघावार देखील काँग्रेसने पकड मिळवली आहे.
09 Feb, 26 11:11 AM
राज्यात ११ वाजेर्यंतच्या कलानुसार भाजपाचे उमेदवार आघाडीवर
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे कल समोर आले आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार,जिल्हा परिषेदेत भाजपा- ७५, शिवसेना-४१, राष्ट्रवादी-४६, काँग्रेस -२२, ठाकरे सेना-१५, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार-०५ एवढ्या जागांवर आघाडीवर आहेत.
09 Feb, 26 11:05 AM
भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे बंधू सागर कल्याणशेट्टी विजयी
सोलापूर : भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे बंधू सागर कल्याणशेट्टी यांचा चपळगाव पंचायत समिती गणातून विजय मिळवल आहे.
09 Feb, 26 11:04 AM
आटपाडी तालुक्यात शिंदे गटाचे उमेदवार आघाडीवर
आटपाडी तालुक्यातील खरसुंडी जिल्हा परिषद गट शिवसेना शिंदे गटाचे जयदीप भोसले विजय झाले आहेत. नेलकरंजी पंचायत समिती गण शिंदे सेनेच्या सुनीता सरगर विजयी आणि खरसुंडी पंचायत समिती गण शिंदे सेनेच्या मीनाक्षी पुजारी विजय विजय झाल्याचे घोषित केले आहे.
09 Feb, 26 11:03 AM
सिंधुदुर्गात माडखोल जिल्हा परिषद गटात अपक्षांचा महायुतीला धक्का
सावंतवाडीमधील माडखोल जिल्हा परिषद गटात तिन्ही अपक्ष उमेदवार विजयी. माडखोल जिल्हा परिषद गटात शिवानी नाईक यांचा विजय तर पंचायत समितीनमध्ये अवनी राऊळ आणि प्रथमेश सावंत विजयी झाले आहेत.
09 Feb, 26 10:17 AM
सिंधुदुर्गात महायुतीचे वर्चस्व; ७ पैकी ७ जागांवर भाजप आणि शिंदेसेना आघाडीवर
सिंधुदुर्ग: जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतमोजणीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीने जोरदार मुसंडी मारली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील सर्व महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. सावंतवाडी आणि वेंगुर्ला परिसरात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी सुरुवातीपासूनच भक्कम आघाडी घेतली आहे. तर कुडाळ मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने (शिंदेसेना) आपले वर्चस्व निर्माण केले आहे. संपूर्ण जिल्ह्याचा विचार करता, भाजप एकूण ५ जागांवर तर शिंदेसेना २ जागांवर आघाडीवर आहे. कोकणच्या या बालेकिल्ल्यात महायुतीने विरोधकांचे आव्हान मोडीत काढल्याचे चित्र सध्या दिसत आहे. राणे समर्थकांचा प्रभाव आणि महायुतीची रणनीती यामुळे हा विजय निश्चित मानला जात असून, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
09 Feb, 26 10:51 AM
सोलापूर जिल्ह्यातील महूद जिल्हा परिषद गटात शिंदेसेनेचं वर्चस्व
सांगोला महूद जिल्हा परिषद गटातून शिंदे सेनेचे दादासाहेब लवटे तर पंचायत समितीमध्ये सोनाली पाटील आणि बाळासाहेब बंडगर विजयी झाले आहेत.
09 Feb, 26 10:48 AM
धाराशिव जिल्हा परिषदेच्या ईटकूर गटातून शिंदेसेनेचे अनंत लंगडे विजयी
धाराशिव जिल्हा परिषदेच्या ईटकूर गटातून शिंदेसेनेचे अनंत लंगडे विजयी
09 Feb, 26 10:44 AM
सोलापूर जिप निकाल: राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते आघाडीवर
सोलापूर जिप निकाल: राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते आघाडीवर
09 Feb, 26 10:43 AM
कणकवली पंचायत समितीमधील तरेळे गणातून भाजपाचे राजेश जाधव विजयी
कणकवलीमधील तरेळे पंचायत समिती गणामधून भाजपाचे राजेश जाधव विजयी
09 Feb, 26 10:41 AM
करमाळा तालुका पांडे जिल्हा परिषद गटात राकाँच्या राणी संतोष वारे आघाडीवर
करमाळा तालुका पांडे जिल्हा परिषद गटात राकाँच्या राणी संतोष वारे १२० मतांनी आघाडीवर ; भाजपा रश्मी बागल पिछाडीवर
09 Feb, 26 10:37 AM
आष्टी पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अमित व्यवहारे विजयी
आष्टी पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अमित व्यवहारे सहा हजार दोनशे एकोणीस मते घेऊन विजयी
09 Feb, 26 10:37 AM
सोलापूर जिल्ह्यात अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीने विजयाचं खातं उघडलं
सोलापूर जिल्ह्यात अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीने विजयाचं खातं उघडलं, माढा तालुक्यातील भोसरे गटातून अश्विनी दळवे विजयी
09 Feb, 26 10:26 AM
रायगड जिल्हा परिषदेच्या मतमोजणीला सुरुवात, सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपा, शिंदेसेनेला आघाडी
रायगडमध्ये जिल्हा परिषदेच्या मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपा आणि शिंदेसेना प्रत्येकी ५ जागांवर आघाडीवर, राष्ट्रवादी अजित पवार ३ तर उद्धवसेना एका जागेवर आघाडीवर
09 Feb, 26 10:17 AM
सिंधुदुर्गात भाजपा ५ जागांवर तर शिंदेसेना २ जागांवर आघाडीवर
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपा जिल्हा परिषदेच्या ५ जागांवर तर शिंदेसेना २ जागांवर आघाडीवर
09 Feb, 26 10:12 AM
कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस तीन जागांवर आघाडीवर
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मतमोजणीमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसने तीन जागांवर आघाडी घेतली आहे. तर कोल्हापूरमधील पंचायत समितींच्या मतमोजणीत ६ जागांवर काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत.
09 Feb, 26 10:04 AM
राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या मतमोजणीला सुरुवात
राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
09 Feb, 26 09:44 AM
भारत-पाकिस्तान सामना होणार; पाक सरकार लवकरच करणार घोषणा
T20 World Cup 2026 मध्ये १५ फेब्रुवारीला कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान आमनेसामने दिसण्याची शक्यता वाढली आहे. पाकिस्तानी मीडियाकडून दावा करण्यात आला आहे की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना होणं शक्य आहे. कुणी केला दावा? कुणाकडून मिळाली माहिती? वाचा सविस्तर बातमी...
09 Feb, 26 09:40 AM
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ८ जागा बिनविरोध, उर्वरित ४२ जागांसाठी आज होणार मतमोजणी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ८ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यात भाजपाने ७ आणि शिंदेसेनेला मिळाला विजय. उर्वरित ४२ जागांसाठी आज मतमोजणी होणार आहे.
09 Feb, 26 09:14 AM
मुंबई मनपामध्ये स्थायी आणि शिक्षण समिती भाजपा आपल्याकडे ठेवणार, तर शिंदेसेनेला बेस्ट समिती मिळणार?
मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौरपदासह स्थायी आणि शिक्षण समिती भाजपाकडे, तर शिंदेसेनेला बेस्ट समितीसह सुधार समितीचं अध्यक्षपद देण्याचं महायुतीनं निश्चित केलं आहे.
09 Feb, 26 08:52 AM
शिंदेसेनेचे सव्वा दोनशेहून अधिक जिल्हा परिषद सदस्य निवडून येतील, उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास
आज लागणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालांमध्ये भाजपा पहिल्या तर शिंदेसेना दुसऱ्या स्थानी राहील. निकालांमध्ये शिंदेसेनेचे सव्वा दोनशेहून अधिक जिल्हा परिषद सदस्य निवडून येतील, उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास
09 Feb, 26 08:30 AM
आमदार विलास भुमरे यांच्या मुलाच्या बोटाला शाई लावल्याप्रकरणी तीन कर्मचारी निलंबित
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या मतदानादरम्यान, आमदार विलास भुमरे यांच्या मुलाच्या बोटाला शाई लावल्याप्रकरणी तीन कर्मचारी निलंबित
09 Feb, 26 08:23 AM
सोलापूर जिल्ह्यातील ६४ जिल्हा परिषद गट व १३६ पंचायत समिती गणाची आज मतमोजणी
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ६४ जिल्हा परिषद गट व १३६ पंचायत समिती गणाची आज मतमोजणी; १० वाजता सुरु होणार मतमोजणी
09 Feb, 26 08:17 AM
विलीनीकरणावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत चर्चा; महत्त्वाच्या घडामोडी घडणार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी हा आठवडा अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. या आठवड्यात अजित पवार गटातर्फे विलीनीकरणाबाबत पक्षांतर्गत चर्चा होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे सुनेत्रा पवार या मंगळवारी उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारतील. आणखीही काही घडामोडी घडतील. वाचा संपूर्ण बातमी
09 Feb, 26 08:05 AM
राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा आज लागणार निकाल
राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. नगर परिषद आणि महानगरपालिका निवडणुकीनंतर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीतही सत्ताधारी भाजपा आणि महायुतीमधील घटक पक्ष मारणार की विरोधी पक्ष चांगली कामगिरी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.