Maharashtra election 2019: NCP's 9 MLAs in our contact; BJP leader reveals on maharashtra Government formation | महाराष्ट्र निवडणूक 2019: राष्ट्रवादीचे 9 आमदार आमच्या संपर्कात; भाजप नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
महाराष्ट्र निवडणूक 2019: राष्ट्रवादीचे 9 आमदार आमच्या संपर्कात; भाजप नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

माढा : राष्ट्रवादी व काँग्रेसच्या कुबड्यावरील हे सरकार फारकाळ टिकणार नसल्याचे आकलन माझ्यापेक्षा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच चांगले आहे. त्यामुळे शिवसेनेने महायुतीच्या जनमताचा आदर करून भाजप सोबत सरकार स्थापण्यास एक पाऊल पुढे टाकल्यास निश्चित महायुतीचे सरकार बनेल. सेना-भाजप हे घरातील भांडण असून हे लवकरच मिळेल, असा आशावाद माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला. 


"राष्ट्रवादीचे 9 आमदार माझ्या संपर्कात असून राज्यात निवडणुका लढण्याची भूमिका राष्ट्रवादीने घेतल्यास राष्ट्रवादीला उमेदवार देखील मिळणार नाहीत. तर महायुतीला मोठा जनादेश मिळाला असून भाजपने 105 आमदार निवडून आले आहेत. एवढे मोठे यश पवार यांना देखील कधी मिळवता आले नाही. राज्य सरकार व केंद्र सरकारने पवारांना नोटीस काढली नव्हती, ते स्वतः ईडी कार्यालयात दाखल झाल्याने सहानभुती मिळविण्यात यशस्वी झाल्याचेही त्यांनी सांगितले.


राष्ट्रपती राजवट लागू नये ही भाजपची इच्छा होती. मात्र, दोन्ही प्रादेशिक पक्षात स्पेस निर्माण झाल्याने समज-गैरसमज झाल्याने राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. याला शिवसेनेला जबाबदार धरणे योग्य नसल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेचे संजय बाबा कोकाटे, भाजपचे राजकुमार पाटील, टायगर ग्रुपचे तानाजी जाधव राजाभाऊ चवरे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

दरम्यान, भाजपा खासदार नारायण राणे यांनी भाजपा सत्तास्थापन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कामाला लागण्याचं सांगितले आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी भाष्य केलं आहे. नारायण राणेंच्या वक्तव्याला किती गांभीर्याने घ्यायचं हा प्रश्न आहे, सध्याच्या काळात सगळे आमदार पक्षासोबत राहतील, जर एखाद्या पक्षातील आमदार फुटला, त्याठिकाणी निवडणुका लागल्या तर ज्या पक्षाचा आमदार फुटला त्याच पक्षाचा उमेदवार उभा राहील आणि अन्य दोन पक्ष त्याला पाठिंबा देतील. जर असं झालं तर ३ पक्षाचा पाठिंबा असलेल्या उमेदवाराला कोणता माइकालाल हरवू शकत नाही असं आव्हान अजित पवारांनी नारायण राणेंना दिलं आहे. 

Web Title: Maharashtra election 2019: NCP's 9 MLAs in our contact; BJP leader reveals on maharashtra Government formation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.