maharashtra election 2019 bjp leader ram shinde pankaja munde likely to face neck to neck fight | महाराष्ट्र निवडणूक २०१९: मुख्यमंत्र्यांच्या दोन सहकाऱ्यांच्या जागा धोक्यात? भाजपाची धाकधूक वाढली
महाराष्ट्र निवडणूक २०१९: मुख्यमंत्र्यांच्या दोन सहकाऱ्यांच्या जागा धोक्यात? भाजपाची धाकधूक वाढली

मुंबई: विधानसभेच्या निकालाला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. राज्याच्या सत्तेच्या चाव्या कोणाकडे राहणार, याचं चित्र उद्या दुपारपर्यंत स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. राज्यातील बहुतांश महत्त्वाच्या नेत्यांच्या जागा सुरक्षित असून त्यांचा विजय जवळपास निश्चित असल्याचं इंडिया टुडे-अ‍ॅक्सिस माय इंडियाच्या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दोन सहकाऱ्यांच्या जागा धोक्यात असल्याचा अंदाज आहे. 

इंडिया टुडे-अ‍ॅक्सिस माय इंडियानं राज्यातील व्हीआयपी मतदारसंघाचा आढावा घेऊन सर्वेक्षण प्रसिद्ध केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (नागपूर नैऋत्य), गिरीश महाजन (जामनेर), सुधीर मुनगंटीवार (बल्लारपूर), चंद्रकांत पाटील (कोथरुड) आणि राधाकृष्ण विखे पाटील (शिर्डी) यांचा विजय सोपा असेल, असा अंदाज सर्वेक्षणातून वर्तवण्यात आला आहे. फडणवीसांच्या मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम मंत्री असलेले एकनाथ शिंदेही त्यांचा कोपरी-पाचपाखडीचा गड राखतील, अशी शक्यता आहे. 

मुख्यमंत्र्यांच्या दोन सहकाऱ्यांना मात्र कडव्या लढतीचा सामना करावा लागणार आहे. जलसंवर्धन मंत्री राम शिंदे यांना कर्जत जामखेडमध्ये कडवी लढत द्यावी लागेल, असं इंडिया टुडे-अ‍ॅक्सिस माय इंडियाचं सर्वेक्षण सांगतं. याठिकाणी राष्ट्रवादीचे रोहित पवार रिंगणात आहेत. महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडेंसमोर राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडेंचं कडवं आव्हान आहे. त्यामुळे परळीत चुरशीची लढत होईल, अशी शक्यता सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आली आहे.  

वरळीत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंचा विजय निश्चित मानला जात आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासमोर फार आव्हान नसेल. मात्र माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना कराड दक्षिणमध्ये विजयासाठी कडवी लढत द्यावी लागू शकते, असा अंदाज सर्वेक्षणातून समोर आला आहे. 
 


Web Title: maharashtra election 2019 bjp leader ram shinde pankaja munde likely to face neck to neck fight
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.