मुंबईत सगळी कामे केली, फाइल्स क्लिअर केल्या; बारामतीला जाण्यापूर्वी अजित पवारांनी काय-काय केले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 14:26 IST2026-01-28T14:22:13+5:302026-01-28T14:26:44+5:30
Ajit Pawar Sad Demise: अजित पवार मुंबईतून बारामतीला जाण्यापूर्वी राज्याचे आर्थिक उत्पन्न कसे वाढेल, यासाठीच कार्यरत होते, असे म्हटले जात आहे.

मुंबईत सगळी कामे केली, फाइल्स क्लिअर केल्या; बारामतीला जाण्यापूर्वी अजित पवारांनी काय-काय केले?
Ajit Pawar Sad Demise: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस(अप) पक्षाचे प्रमुख अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार सभा घेण्यासाठी अजित पवार मुंबईहून बारामती येथे जात होते. सकाळी ८ वाजून ४५ मिनिटांनी बारामती विमानतळावर उतरताना अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर विमानाला मोठी आग लागली. यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण राज्य शोकाकूल झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि असंख्य कार्यकर्ते बारामतीत पोहोचले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, राहुल गांधी, नितीन गडकरी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला.
महानगरपालिका निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी पुन्हा एकदा कंबर कसून तयारी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हेही जिल्हा परिषद निवडणुकांच्या तयारीला लागले होते. बारामतीत जाण्यापूर्वी मंगळवार, २७ जानेवारी २०२६ रोजी अजित पवार मुंबईत होते. मुंबईत मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीला अजित पवार उपस्थित राहिले होते.
मुंबईत सगळी कामे केली, फाइल्स क्लिअर केल्या
- सकाळी ८.३० वाजता अजित पवार मंत्रालयात गेले आणि कामकाजाला सुरुवात केली.
- अजित पवारांनी कामकाजावेळी समोर असलेल्या सर्व फाइल्स क्लिअर केल्या.
- वित्त विभागाचे सचिव, महसूल विभागाचे सचिव, जीएसटी आयुक्त, उत्पादन शुल्क आयुक्त यांच्या समवेत या आर्थिक वर्षात राज्याला मिळालेल्या उत्पन्नाचा आढावा घेतला.
- अजित पवारांनी उत्पन्न वाढीच्या सूचना सर्व सचिवांना दिल्या.
- ही बैठक दीड तास चालली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसमवेत कॅबिनेट बैठकीसंदर्भात अजित पवारांनी चर्चा केली.
- कॅबिनेट बैठक,पायाभूत सुविधा समिती बैठकीला ते उपस्थित राहिले.
- ही बैठक झाल्यावर अजित पवार पुन्हा दालनात गेले. तिथे मंत्री चंद्रकांत पाटील व त्यांची चर्चा झाली.
- अजित पवार दुपारी २.३० वाजता देवगिरी बंगल्याकडे रवाना झाले.
- शेवटच्या दिवशीही राज्याचे आर्थिक उत्पन्न कसे वाढेल, यासाठीच ते कार्यरत होते.
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित आशाताई अनंतराव पवार यांचे दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी दुःखद निधन झाले आहे. यामुळे महाराष्ट्रात २८ ते ३० जानेवारी २०२६ या तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, असे सामान्य प्रशासन विभाग (राजशिष्टाचार) विभागामार्फत कळविण्यात आले आहे.