Maharashtra Day: औरंगपुऱ्यातून 'दुनियादारी'ची झेप 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2018 07:10 AM2018-05-01T07:10:00+5:302018-05-01T07:10:00+5:30

योगेशकडे आर्थिक गरिबी होती पण माणसांची श्रीमंती भल्याभल्यांना लाजवणारी. त्याच्या संपर्कात येणारा त्याचा फॅन होत नाही तर चक्क त्याच्या प्रेमात पडतो. महाविद्यालाची फी भरतांना त्याची नेहमीच ओढाताण असायची. घरची परिस्थिती चांगली नसल्याने घरी पैसे मागू शकत नाही आणि शिकण्याची (फक्त नाटक शिकण्याची) अनिवार इच्छा त्याला स्वस्त बसू देत नव्हती.

Maharashtra Day: story of artist Yogesh Shirsat | Maharashtra Day: औरंगपुऱ्यातून 'दुनियादारी'ची झेप 

Maharashtra Day: औरंगपुऱ्यातून 'दुनियादारी'ची झेप 

googlenewsNext

अॅड. जयेश वाणी

मी - योग्या कसायंस बे... 
तो – मस्त, तुझं काय चाल्लंय.
.. 

..... आणि मग इतर ‘खास’ मराठवाडी भाषेतल्या गप्पा सुरु होतात. ऐकणाऱ्याला वाटावं की हे कसल्या भाषेत बोलताहेत अशी एकदम मैत्रीवाली भाषा. समोरुन बोलणारा ‘तो’ कोण आहे कळल्यावर अनेकांना मी फेकाफेकी करतोय की काय असं वाटावं इतकं आमच्यातलं संभाषण कॉमन असतं. हे ‘कॉमन’ संभाषण करणारा माणुस मात्र खास आहे. महाराष्ट्राला त्याचा परिचय झाला तो त्याच्या ‘पाळण्यातून’. पाळणा हलवत हलवत ठेवत याने महाराष्ट्राला मनमुराद हसवलं आणि हसवता हसवता अंतर्मुखही केलं. या योग्याचं खरं किंवा महाराष्ट्राला परिचित नाव आहे योगेश शिरसाठ. हो तोच योगेश ज्याला फु बाई फु मालिकेतून लोकांनी डोक्यावर घेतलं, या आमच्या योगेशने दुनियादारीमधून 70 एम.एम. वर पदार्पण केलं आणि आम्हा मित्रांची छाती अभिमानाने फुलून गेली.

योग्याचा हा प्रवास इतका सोप्पा कधीच नव्हता. त्याची आणि माझी पहिली पहिली भेट कधी झाली हेही आठवत नाही, पण एक नक्की योगेशला मी पहिल्यांदा भेटलो ती जागा एक तर औंरगपुऱ्यातली चहाची टपरी असेल किंवा सरस्वती भुवन महाविद्यालयाचा नाट्यशास्त्र विभाग. योगेश सापडण्याच्या या दोनच जागा. तो एक तर नाटकाची तालिम करत सापडणार किंवा मित्रांच्या गराड्यात. घरची परिस्थिती खरं तर खुपच नाजुक, याच्या आईला त्याही आर्थिक अडचणीच्या काळात समाजसेवेचं वेड. घरचं खाऊन लष्कराच्या भाकऱ्या भाजायच्यात या आमच्या मराठवाड्याच्या म्हणीनुसार योगेशच्या घरची परिस्थिती अत्यंत बिकट असुनही त्याची आई लोकांच्या मदतीला कधीही तयार. हाच सामाजिक बांधिलकीचा वारसा योग्याच्या स्कीट आणि स्क्रीप्टमधून बघायला मिळतो.

साल नक्की आठवत नाही पण त्यावर्षी यु.जी.सी. च्या झोनल आणि नॅशनल युथ फेस्टीवलच्या धर्तीवरच महाराष्ट्र सरकारने इंद्रधनुष्य नावाने राज्यातल्या विद्यापिठांसाठी युथ फेस्टीवलचं आयोजन केलं होतं. झोनल राजकोट, गुजरातमध्ये तर पहिलं इंद्रधनुष्य मुंबईच्या एस.एन.डी.टीमध्ये योगेश अर्थातच नाट्यशास्त्र विभागातून कला सादर करणार होता. आताचा मुंबई विद्यापिठाच्या ललित कला अकादमीचा संचालक आणि बाजीराव मस्तानी चित्रपटातून देशाला त्याच्या पहाडी आवाजाने विस्मयचकित करणारा डॉ. गणेश चंदनशिवे आमच्या विद्यापिठाचा टिम मॅनेजर  म्हणून आमच्यासोबत. कायम दोन पँट आणि दोनच शर्टांमधे दिसणाऱ्या योगेशला विद्यापिठाचा ब्लेझर (कोट) मिळाला तेव्हा त्याच्या डोळ्यात दिसणारा अभिमान आणि कौतुक कुठल्याही स्वर्गीय आनंदाला लाजवणारं होतं. 

योगेशकडे आर्थिक गरिबी होती पण माणसांची श्रीमंती भल्याभल्यांना लाजवणारी. त्याच्या संपर्कात येणारा त्याचा फॅन होत नाही तर चक्क त्याच्या प्रेमात पडतो. महाविद्यालाची फी भरतांना त्याची नेहमीच ओढाताण असायची. घरची परिस्थिती चांगली नसल्याने घरी पैसे मागू शकत नाही आणि शिकण्याची (फक्त नाटक शिकण्याची) अनिवार इच्छा त्याला स्वस्त बसू देत नव्हती. अशावेळी हाच त्याच्यावर प्रेम करणारा मित्रांचा समुह त्याच्यासाठी धावुन यायचा ज्याला जितकं शक्य असेल असेल तितकी तो मदत करण्याचा प्रयत्न करायचा. योगेशही सातत्याने कधी पथनाट्य करुन तर कधी गावातल्या जत्रांमधून बतावणी सादर करुन पैसे कमवायचा आणि शिक्षण पूर्ण करायसाठी धडपडत रहायचा. योगेशला इंग्रजी किंवा मराठीच्या किंवा अगदीच इतर कुठल्याही विषयाच्या तासिकेला बसलेला बघितलेल्या विद्यार्थ्याला मी आजही 5000 रुपये बक्षिस द्यायला तयार आहे. योगेश दिसणार ते फक्त नाटक करताना. महत्वाचं म्हणजे नाटक हे मनोरंजनाचंच नाही प्रबोधनाचंही सशक्त माध्यम आहे हे योगेश कधी विसरला नाही. आता तर तो चला हवा येऊ द्या साठी स्क्रीप्टही करतोय आणि अभिनयही. 

नाटकाचं असं कुठलंच अंग नाही ज्याविषयी योगेशला कळत नाही. नाटक करतांना तंगी नेहमीच असते. आमचे डॉ. दिलीप घारे सर नेहमी म्हणतात नाटक त्याने करावं ज्याच्या घरी तीन पीढ्या बसुन खातील इतकी संपत्ती आहे किंवा ज्याच्याकडे गमवायला काहीच नाही अशा कफल्लक माणसाने. योगेश दुसऱ्या सदरात मोडणारा असल्याने त्याच्या नशिबी संघर्ष अधिक तीव्र होता. त्यावेळी केबल टिव्हीवर लोकलच्या जाहिरातींना मोठा वाव होता, योगेशने त्या जाहिरातींसाठी रंगभुषा (मराठीत याला मेकप म्हणतात) करण्याचा उद्योग सुरु केला. ए.सी.एन, एम.सी.एन. या लोकल केबल चॅनलवर झळकणाऱ्या जाहिरातींसाठी योगेश रंगभुषा करायचा.

500 रुपये एका जाहिरातीसाठी दिवसभर काम करुन आणि लोकलच्या स्टारचे नखरे सांभाळुन मिळायचेत. योगेशची त्याची एक पेटी घेउन दिवसभर हे सगळे करायचा. संध्याकाळी नाटकाच्या प्रयोगाला (मराठीत याला शो म्हणतात) पुन्हा नव्याने रंगकाम करताना दिसायचा. खिशात पैसे नव्हते तरीही नाटकावर प्रेम असल्याने योगेशने कधी नाटकवाल्यांना अडवुन बघितलं नाही. पैसे दिले तर घ्यायचे नाहीतर नाही पण नाटकांसाठी पुर्ण क्षमतेने रंगभुषाकाराचं काम करायचा. कधी पैसे कमावुन तरी कधी माणसं, त्यांचं प्रेम कमावून योगेश संघर्ष करत राहिला.

त्याच्या या संघर्षाला महाराष्ट्राने भरभरुन सलाम केला, त्याच्या स्किटमधुन प्रसवणाऱ्या सामाजिक संदेशांना टाळ्याच्या गजरात अभिवादन (याला मराठीत स्टॅंडिंग ओवेशन म्हणतात) केलं. योगेशनेही त्याप्रेमाचा स्विकार विनम्रतेनं केला. गरिबीत न लाजता आणि चांगल्या दिवसात न माजता योगेश आज पुढे जात आहे. त्याला कधीही फोन करा त्याचं ते खोटं हसणं आपुलकीची जाणीव करुन देतं. स्टारडम बाजूला करुन तो आजही मित्रांच्या घोळक्यात वावरतो. माझ्यासारख्याला त्याच्या नव्या गाडीत मी आग्रह धरताच आजही सोनेरी महलाची सैर करवून आणतो. अशीचच माणसं तर महाष्ट्राच्या अभिमानाचं लक्षण आहे. नाही का ? 

(लेखक फौजदारी वकील असून त्यापूर्वी पत्रकारितेत सक्रीय होते)
 

Web Title: Maharashtra Day: story of artist Yogesh Shirsat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.