विरोधी पक्ष नेतेपदावर आघाडीचा दावा

By Admin | Updated: May 31, 2014 05:37 IST2014-05-31T05:37:35+5:302014-05-31T05:37:35+5:30

कल्याण डोंबिवली महापालिकेतील विरोधी पक्षनेते पदावर कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने दावा केल्याने विरोधी पक्ष असलेल्या मनसेची पंचाईत झाली आहे.

Leader of Opposition Leader Leader | विरोधी पक्ष नेतेपदावर आघाडीचा दावा

विरोधी पक्ष नेतेपदावर आघाडीचा दावा

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेतील विरोधी पक्षनेते पदावर कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने दावा केल्याने विरोधी पक्ष असलेल्या मनसेची पंचाईत झाली आहे. काँगे्रसचे सदस्य विश्वनाथ राणे यांचे नाव विरोधी पक्षनेते म्हणून जाहीर करावे, अशी मागणी शुक्रवारी पार पडलेल्या महासभेत केली आहे. लोकसभा निवडणुकीत उफाळून आलेल्या शिवसेना आणि मनसेच्या वादातून सत्ताधारी शिवसेनेनेच ही खेळी खेळल्याची चर्चा असून महापौर कल्याणी पाटील यावर काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पालिकेतील पक्षीय बलाबल पाहता सत्ताधारी शिवसेना भाजपा आणि अपक्ष असे ४७, विरोधी पक्ष असलेल्या मनसेकडे २८ तर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीकडे ३२ असे बलाबल आहे. २०१० निवडणुकीनंतर कुठल्याच पक्षाला बहुमत नसल्याने शिवसेनेने मनसेशी छुपी युती करून महापौरपद पटकावले, तर त्या बदल्यात विरोधी पक्षनेतेपद मनसेला बहाल केले होते. दरम्यान, आता या पदावर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने दावा केल्याने संख्याबळानुसार मनसेचे पद धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. या शिफारशीवर विचारविनिमय करून निर्णय घेतला जाईल, असे महापौर पाटील यांनी स्पष्ट केले. दरम्यान तब्बल साडेतीन वर्षांनी विरोधी पक्ष पदावर आघाडीने दावा केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यासंदर्भात काँग्रेसचे गटनेते सचिन पोटे यांच्याशी संपर्क साधला असता मनसेपेक्षा आमचे आघाडीचे संख्याबळ अधिक असल्याने दावा केल्याचे सांगून अधिक बोलण्यास नकार दिला. आघाडीची शिफारस महापौर पाटील यांनी मान्य केली तर मनसेला विरोधी पक्ष बहाल करण्याची शिवसेनेची कृती चुकीची होती, हेदेखील स्पष्ट होणार आहे. दरम्यान, महापालिका अधिनियम १९(अ)प्रमाणे विरोधी पक्ष नेतापद घोषित करण्याचा अधिकार महापौरांना आहे़ त्यामुळे उद्या शनिवारी होणार्‍या अंदाजपत्रकाच्या महासभेत महापौर पाटील निर्णय घेण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Leader of Opposition Leader Leader