Ladki Bahin Yojana: मोठी खळबळ...! हजारो महिलांचे लाडकी बहीण योजनेचे पैसे येणे थांबले; झेडपी निवडणुकीपूर्वी पसरली नाराजी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 14:10 IST2026-01-19T14:10:03+5:302026-01-19T14:10:34+5:30
Ladki Bahin Yojana Benefit Stop: बुलढाणा जिल्ह्यात ई-केवायसी मधील त्रुटीमुळे ३० हजार महिलांचा लाडकी बहीण योजनेचा लाभ थांबला आहे. योजना बंद होण्याच्या अफवेमुळे महिलांची जिल्हा कार्यालयात धाव. वाचा सविस्तर.

Ladki Bahin Yojana: मोठी खळबळ...! हजारो महिलांचे लाडकी बहीण योजनेचे पैसे येणे थांबले; झेडपी निवडणुकीपूर्वी पसरली नाराजी...
बुलढाणा: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील हजारो महिलांची धाकधूक वाढली आहे. जिल्ह्यातील जवळपास ३० हजार महिलांचा लाभ गेल्या दोन महिन्यांपासून तांत्रिक कारणांमुळे थांबला असून, योजना कायमस्वरूपी बंद होणार असल्याच्या अफवेमुळे महिलांनी जिल्हा महिला व बालकल्याण कार्यालयात मोठी गर्दी केली आहे. अन्य काही ठिकाणी लाडक्या बहीण योजनेचे पैसे येत नसल्याने महिला आंदोलनाला बसल्याचेही समोर आले आहे.
बुलढाणा जिल्ह्यात एकूण साडेसहा लाखांहून अधिक महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. मात्र, प्रशासकीय पडताळणी दरम्यान ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेत त्रुटी आढळल्याने सुमारे ३० हजार महिलांचे हप्ते थांबवण्यात आले आहेत. बँक खाते आधारशी लिंक नसणे किंवा तांत्रिक माहितीतील तफावत यामुळे हा लाभ थांबल्याचे समोर आले आहे.
अफवांनी वाढवला तणाव
योजना बंद होणार अशा वावड्या उठल्याने ग्रामीण भागातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. यामुळे संतप्त आणि चिंतेत असलेल्या महिलांनी थेट कार्यालयात धडक देऊन चौकशी सुरू केली आहे. "आम्हाला ई-केवायसीमधील त्रुटी दुरुस्त करण्याची संधी देण्यात यावी, जेणेकरून आमचा हक्काचा लाभ आम्हाला पुन्हा मिळेल," अशी मागणी लाभार्थी महिलांनी केली आहे.
प्रशासकीय खुलासा
महिला व बालकल्याण विभागाने स्पष्ट केले आहे की, योजना बंद झालेली नाही. केवळ ज्यांच्या कागदपत्रात किंवा ई-केवायसीमध्ये त्रुटी आहेत, त्यांचाच लाभ तात्पुरता थांबवण्यात आला आहे. त्रुटींची पूर्तता होताच रखडलेला लाभ दिला जाईल, असे संकेत प्रशासनाकडून मिळत आहेत.