लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना, नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 10:02 IST2025-06-21T09:59:47+5:302025-06-21T10:02:38+5:30

कोकण किनारपट्टीला भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्रामार्फत उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

High tide warning and orange alert in Konkan, western Maharashtra | लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना, नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा

लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना, नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : कोकण किनारपट्टीला भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्रामार्फत उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच भारतीय हवामान विभागाकडून  पुणे घाट परिसरात शनिवारी मध्यरात्रीपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

राज्यात मागील २४ तासांमध्ये (२० जून २०२५ रोजी सकाळपर्यंत) रत्नागिरी जिल्ह्यात ४१.७ मिमी पाऊस झाला आहे. तर ठाणे जिल्ह्यात ४१.६ मिमी, पालघर ४१.६ मिमी, रायगड जिल्ह्यात ४०.१ मिमी  आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात ३१.७ मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. अनेक भागात प्रतीक्षा कायम आहे.

गोदावरीला पूर; अनेक गावांचा संपर्क तुटला
अहिल्यानगर येथील कोपरगाव तालुक्यातील वारी येथील गोदावरीला पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. गुरुवारी रात्री नांदूर मधमेश्वर धरणातून ३० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आला आहे.  

उजनीतून भीमा नदीत पाणी 
उजनी धरणात दौंड येथून येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात लक्षणीय वाढ झाली असून, ७० हजार क्युसेकपर्यंत विसर्ग वाढला. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर उजनीची पातळी स्थिर ठेवण्यासाठी उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

चंद्रभागेत तरुण, कालव्यात महिला बुडाली 
चंद्रभागेत पोहण्यासाठी गेलेल्या शुभम ज्ञानेश्वर पावले (२७, रा. अलतगे, बेळगाव) या भाविकाचा गुरुवारी पहाटे बुडून मृत्यू झाला आहे. तर तिलारी धरणाच्या कालव्यात पडल्याने कसई-गावठणवाडी (जि. सिंधुदुर्ग) येथील सुलोचना प्रभाकर साळकर (७५) यांचा मृत्यू झाला.

रत्नागिरी जिल्ह्यात पूर; अतिवृष्टीमुळे पाणीच पाणी
रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खेड, दापोली नगरपालिका हद्दीमध्ये पुराचे पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली. बोरघर वावे तर्फे नातू चिंचवली रस्त्यावरच्या पुलावर पाणी गेल्याने रस्ता बंद होता. वनोशी अंगणवाडी पन्हाळे फणसूर रस्त्याच्या मधील पुलावर पुराचे पाणी आल्याने रस्ता बंद केला होता.  चिंचगर कोरेगाव भैरवी रस्त्यावरील पुलावर पुराचे पाणी आल्याने रस्ता बंद केला होता. सद्यस्थितीत वाहतूक सुरळीत चालू आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ (गुहागर- चिपळूण-विजापूर) सोनपात्र वळणाजवळ दरड कोसळल्याने काही काळ वाहतूक बंद करून दरड बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे.  

प्रकल्पांमध्ये वाढला साठा 
राज्य आपत्कालीन केंद्राने दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदी इशारा पातळीवर आहे. पुणे विभागात झालेल्या अतिवृष्टीमुळे खडकवासला धरण मुठा नदी १५,०९२ क्युसेक, बंडगार्डन बंधारा पुणे-२४,४१६ क्युसेक, भीमा नदी दौंड पूल विसर्ग १०,८३३ क्युसेक, घोड नदी घोड धरण  ४,००० क्युसेक, कण्हेर धरण सातारा ५०० क्युसेक, वेण्णा नदी-१,००० क्युसेक विसर्ग सुरू असून नदी किनाऱ्यालगत गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील गोदावरी नदी नांदूर मधमेश्वर धरणातून  २२,३४५ क्युसेक, सीना नदी - सीना धरणातून  २८९ क्युसेक विसर्ग सुरू आहे.

Web Title: High tide warning and orange alert in Konkan, western Maharashtra