लम्पी रोगावरील सरकारच्या उपाययोजना तकलादू, हजारो पशुधनांचा अजूनही मृत्यू, नाना पटोलेंचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 03:45 PM2022-12-06T15:45:11+5:302022-12-06T15:45:46+5:30

Nana Patole: राज्यात १०० टक्के लसीकरण झाले असेल तर आजही जनावरांना लम्पी रोगाची लागण का होत आहे ? व हजारो जनावरे मृत्यूमुखी का पडत आहेत? याचे उत्तर राज्य सरकारने दिले पाहिजे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

Govt's measures against Lumpy disease falter, thousands of livestock still die, allegation of fraud | लम्पी रोगावरील सरकारच्या उपाययोजना तकलादू, हजारो पशुधनांचा अजूनही मृत्यू, नाना पटोलेंचा आरोप

लम्पी रोगावरील सरकारच्या उपाययोजना तकलादू, हजारो पशुधनांचा अजूनही मृत्यू, नाना पटोलेंचा आरोप

Next

मुंबई - लम्पी रोगाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यात राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला अपयश आले आहे. लम्पी रोगाची लागण वाढत असताना राज्य सरकारने मोफत लसीकरण मोहिम राबवून १०० टक्के लसीकरण केल्याचा दावा केला आहे. राज्यात १०० टक्के लसीकरण झाले असेल तर आजही जनावरांना लम्पी रोगाची लागण का होत आहे ? व हजारो जनावरे मृत्यूमुखी का पडत आहेत? याचे उत्तर राज्य सरकारने दिले पाहिजे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, लम्पी आजारामुळे राज्यातील पशुमालक चिंतेत आहेत. सरकार लसीकरण पूर्ण झाल्याचे सांगत आहे तरीही रोगाची लागण कमी होताना दिसत नाही. मागील पंधरा दिवसात ७ हजार पशुंचा लम्पी रोगामुळे मृत्यू झाला असून लागण झालेल्या पशुंचा आकडाही अजून लाखात असल्याच्या बातम्या येत आहेत. आतापर्यंत लम्पी रोगामुळे राज्यातील तब्बल २४ हजार पशुधनांचा मृत्यू झाला आहे. १०० टक्के लसीकरण झाले असेल तर ह्या लसी लम्पी रोगाची लागण रोखण्यात प्रभावी नाहीत का? लम्पी रोगामुळे पशुधनाचा मृत्यू झाल्यास पशुमालकांना राज्य सरकार आर्थिक मदत देत आहे पण यातून प्रश्न सुटत नाही. लम्पी रोग नियंत्रणावर मिळवण्यात राज्य सरकारचे फारसे लक्ष नाही, असे यातून दिसते.

लम्पी रोगामुळे केवळ गोवंशीय पशुधन त्यातच देशी गाईंचे मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे. लम्पी रोगामुळे दुग्धव्यवसायावरही परिणाम होत असून दुग्ध संकलन घटल्याचे दिसत आहे. राज्यातील ३३ जिल्ह्यांत लम्पी रोगाचा प्रादुर्भाव झाला होता, वेळीच लसीरकरण केले तर लम्पीपासून जनावरांना धोका संभवत नाही असे सरकार म्हणत आहे. राज्यात मोफत लसीकरण झाल्याचा सरकारचा दावा आहे असे असतानाही रोगावर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात सरकारी उपाययोजना कमी पडत आहेत. पशुधन हे लाखामोलाच असून ते टिकवले पाहिजे. यासाठी राज्य सरकारने यात तातडीने लक्ष घालावे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Web Title: Govt's measures against Lumpy disease falter, thousands of livestock still die, allegation of fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.