महायुती सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा; काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 07:51 PM2024-06-11T19:51:47+5:302024-06-11T19:53:28+5:30

राज्यातील विविध प्रश्नांसाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या नेतृत्वात नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. 

Dismiss the maharashtra government and impose President rule; Congress Nana Patole and Delegation demand to Governor Ramesh Bais | महायुती सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा; काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी

महायुती सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा; काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी

मुंबई - राज्यातील जनता दुष्काळात होरपळून निघत असताना महायुती सरकारला त्याचे गांभीर्य नाही. लोकसभा निवडणुकीवेळी राज्यात २६७ शेतकरी आत्महत्या झाल्या आणि निवडणुकीनंतरही या आत्महत्या कमी झालेल्या नाहीत. DBT च्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुरवल्या जाणारी खते, बियाणे, औषधे दिलेली नाहीत. टेंडर न काढताच मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने अव्वाच्या सव्वा किंमत वाढवून कोट्यवधी रुपयांची खरेदी करण्यात आली याला विरोध करणाऱ्या कृषी आयुक्तांना बाजूला करण्यात आले. सरकारने राज्यात टँकर माफिया तयार केले आहेत. ही सर्व परिस्थिती पाहता भ्रष्टाचारात बरबटलेल्या महायुती सरकारला सत्तेतून बाहेर काढून राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी काँग्रेसनं राज्यपालांकडे केली आहे.   

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन दुष्काळ व राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा केली. राज्यपालांना भेटल्यानंतर माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  म्हणाले की, राज्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती असताना सरकार सुट्टीवर गेले होते तर काही मंत्री परदेशात गेले होते. मंत्र्यांना परदेशात जाण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागते. या मंत्र्यांनी कोणाची परवानगी घेतली होती, ह्याचा खुलासा झाला पाहिजे. शेतकरी संकटात सापडलेल्या आहे, त्याला आधाराची गरज आहे. राज्यातील दुष्काळाची परिस्थिती पाहता शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी द्यावी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एकरी ४ लाख रुपये द्यावेत, जनावरांसाठी चारा छावण्या सुरु कराव्यात व पिण्याच्या पाण्याची सोय करावी. राज्यात खतांचा काळाबाजार सुरु आहे. खरीपाच्या पेरणीसाठी खते आणि बियाणे सरकारने पुरवावे अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे.

महापुरुषांचा अपमान सहन करणार नाही

छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले हे आमचे दैवत आहेत. संसद परिसरात असलेल्या या दैवतांचे पुतळे भाजपा सरकारने काढले आहेत त्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला असून याबाबत राष्ट्रपती महोदयांना आमच्या भावना कळवा. आमच्या महापुरुषांचा अपमान सहन केला जाणार नाही असंही नाना पटोलेंनी म्हटलं.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची दखल घ्या. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषण सुरु केलेले आहे, राज्य सरकारने जरांगे पाटील यांच्या उपोषणाची दखल घ्यावी असे नांदेडचे काँग्रेस खासदार वसंतराव चव्हाण यांनी यावेळी मागणी केली. 
 

Web Title: Dismiss the maharashtra government and impose President rule; Congress Nana Patole and Delegation demand to Governor Ramesh Bais

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.