मुंबई - राज्याच्या रिक्त असलेल्या राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड झाल्याची बातमी सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. अनेक जण या बातमीचा हवाला देत सरकारच्या निर्णयाचं कौतुक करत बोरवणकर यांना शुभेच्छा देत आहेत. राज्यात महिला, मुलींवरील अत्याचार वाढले असताना राज्य महिला आयोग अध्यक्षपद हे रिक्त आहे. या पदावरून रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिल्यापासून अद्याप कुणाची नियुक्ती झाली नाही. त्यात मीरा बोरवणकर यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याने नेमकं खरे काय असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.
अद्याप माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांची राज्य महिला आयोग अध्यक्षपदी निवड झालेली नाही. मीरा बोरवणकर यांच्या निवडीबाबतच्या सर्व बातम्या खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या असल्याची माहिती एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. मीरा बोरवणकर यांच्या निवडीबाबत कुठलाही अधिकृत निर्णय झाला नाही. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या बातम्या खोट्या असल्याचं सांगण्यात येत आहे.
रोहित पवारांनी केली होती मागणी
राज्य महिला आयोग अध्यक्षपदावरून रुपाली चाकणकर पायउतार झाल्यानंतर या जागेवर एखाद्या माजी आयपीएस अधिकाऱ्याची नेमणूक करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली होती. त्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मीरा बोरवणकर यांच्या नावाची मागणी या पदासाठी केली होती. त्यामुळे मीरा बोरवणकर यांचे नाव चर्चेत आले. परंतु मीरा बोरवणकर यांच्या नावाबाबत सरकारकडून कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. त्यामुळे सध्या सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या बातमीत कुठलेही तथ्य नाही.
कोण आहेत मीरा बोरवणकर?
पंजाबच्या गुरुदासपूरमध्ये चढ्ढा कुटुंबात जन्मलेल्या मीरा बोरवणकर या पुढे आयपीएस अधिकाऱ्याच्या भूमिकेतून महाराष्ट्राच्या मातीशी एकरूप झाल्या. संपूर्ण कारकीर्दीतून त्यांनी पोलीस दलातील कार्यक्षम महिला अधिकारी हा लौकिक संपादन केला. मुंबईतील अतिशय संवेदनशील भागात उपायुक्त म्हणून प्रभावी काम केल्यानंतर त्यांना अधीक्षक म्हणून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची स्वतंत्र जबाबदारी मिळाली होती. पुणे पोलीस आयुक्त म्हणूनही त्यांनी काम केले होते. अलीकडेच मॅडम कमिशनर नावाच्या त्यांचे पुस्तक प्रसिद्ध झाले. त्यात अजित पवारांवरील आरोपांमुळे खळबळ उडाली होती.
Web Summary : Reports of ex-IPS officer Mira Borwankar's appointment as Maharashtra Women's Commission head are false. No official decision has been made, despite social media buzz and political requests. The post remains vacant since Rupali Chakankar's resignation.
Web Summary : पूर्व आईपीएस अधिकारी मीरा बोरवणकर की महाराष्ट्र महिला आयोग के अध्यक्ष के रूप में नियुक्ति की खबरें झूठी हैं। सोशल मीडिया और राजनीतिक अनुरोधों के बावजूद, कोई आधिकारिक निर्णय नहीं लिया गया है। रूपाली चाकणकर के इस्तीफे के बाद से पद खाली है।