नसरापूर (जि. पुणे) : महाराष्ट्र दिनी भोर तालुक्यातील नसरापूर येथे बालिकेवर आत्याचार आणि खूनाच्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला असताना, आरोपी भीमराव कांबळे (६५, रा. साळवडे) याच्या कुटुंबीयांनीच त्याच्यावर तीव्र संताप व्यक्त करीत कठोर शिक्षेची मागणी केली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आरोपीची पत्नी आणि मुलाने त्याच्याशी गेल्या १० वर्षांपासून कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले.
आरोपीच्या पत्नीने अत्यंत भावनिक प्रतिक्रिया देताना, “ज्या ठिकाणी घटना घडली, त्याच ठिकाणी त्याला ठेचून मारलं पाहिजे. मला ११ नातवंडे आहेत. त्या चिमुरडीच्या कुटुंबीयांना काय वेदना होत असतील, याची कल्पनाही करवत नाही. मी स्वतः आई आहे,” असे सांगताना त्या ढसाढसा रडल्या. “तो बाहेर काय करायचा, याची आम्हाला काहीच माहिती नव्हती. घरात मात्र त्याने मुलींशी गैरवर्तन केले नाही,” असा दावा त्यांनी केला. मात्र, त्याच्यावर पूर्वी झालेले आरोप माहिती असल्याचेही मान्य केले.
त्याच्याशी आमचा संबंध नाही, कुटुंबाला दोष नको
आरोपीच्या मुलानेही वडिलांच्या कृत्याचा तीव्र निषेध करत कठोर शब्दांत संताप व्यक्त केला. “तो माझा बाप आहे हीच माझी चूक आहे. त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्या,” अशी मागणी त्याने केली. “त्या चिमुरडीला जितक्या वेदना झाल्या, तशाच वेदना त्यालाही झाल्या पाहिजेत,” असेही तो म्हणाला.
“पूर्वीही त्याने कुटुंबातील सदस्यांवर अत्याचार केल्याच्या घटना घडल्या होत्या. तेव्हा आम्हाला घर सोडून जावे लागले. त्यानंतर आमचा त्याच्याशी काहीही संबंध राहिला नाही.” कुटुंबीयांना दोष देऊ नये, अशी विनंतीही त्याने केली. या प्रकरणानंतर पोलिसांनी आरोपीच्या घरावर नोटीस लावून पुढील तपास सुरू केला आहे.
फाशी मिळेपर्यंत तुमच्यासोबत : अमितेश कुमार
पुणे : पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोमवारी पीडितेच्या घरी जात तिच्या आई-वडिलांची भेट घेतली. आरोपीला फाशीची शिक्षा होईपर्यंत मी तुमच्या सोबत आहे, तुम्हाला कधीही माझ्याशी काही बोलायचे असेल, तर मला सांगा, मी तुमच्या घरी येईल, असे आश्वासन देताना त्यांचे डोळे पाणावले होते. या प्रकरणासाठी लवकरच विशेष सरकारी वकील नियुक्त केला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
Web Summary : Following the Nasrapur atrocity, the accused's family expressed outrage and demanded severe punishment, stating they've had no contact with him for ten years. The police are investigating, and the Police Commissioner assured support to the victim's family.
Web Summary : नसरापूर अत्याचार के बाद, आरोपी के परिवार ने आक्रोश व्यक्त किया और कड़ी सजा की मांग की, उन्होंने कहा कि उनका उससे दस साल से कोई संपर्क नहीं है। पुलिस जांच कर रही है, और पुलिस आयुक्त ने पीड़िता के परिवार को समर्थन का आश्वासन दिया।