‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 08:34 IST2026-04-30T08:33:24+5:302026-04-30T08:34:05+5:30
ठाकरेंचे सत्ताकेंद्र म्हणजे मातोश्रीच आणि तिथूनच त्यांनी सूत्रे हलवायला हवी होती, अशा भावना त्यावेळी व्यक्त झाल्या होत्या.

‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
मुंबई - आमदार, खासदारकीपासून स्वत:ला दूर ठेवत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हयातभर राजकारण केले आणि रिमोट कंट्रोलची भूमिका बजावली. त्यांचे पुत्र माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तशीच वाटचाल पुन्हा एकदा सुरू केली आहे. विधान परिषदेवर पुन्हा न जाण्याचा निर्णय घेत ‘मातोश्री’ने पिताश्रींच्या मार्गाने जाण्याचा निर्णय घेतला आहे.
विधानसभेच्या २०१९ मधील निवडणुकीत भाजप-शिवसेनेला पूर्ण बहुमत मिळाले होते; पण, अडीच वर्षांचे मुख्यमंत्रिपद देण्याचा शब्द भाजपने पाळला नाही, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी सर्वांनाच आश्चर्यचकित करणारा निर्णय घेतला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शिवसेना-काँग्रेस आणि स्वत:चा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशी मोट बांधली आणि महाविकास आघाडीचा जन्म झाला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यानंतर ते विधान परिषदेवर निवडून गेले. त्यांच्या आधी त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे हे विधानसभेची निवडणूक जिंकलेले होते आणि ‘ठाकरे संसदीय सक्रिय राजकारणात जाणार नाहीत’ हा पण मोडला गेलेलाच होता; पण, २०१९ मध्ये सिनियर ठाकरे म्हणजे उद्धव त्याच मार्गावरून गेले. तेव्हा टीका आणि समर्थन दोन्हीही झाले. ठाकरेंचे सत्ताकेंद्र म्हणजे मातोश्रीच आणि तिथूनच त्यांनी सूत्रे हलवायला हवी होती, अशा भावना त्यावेळी व्यक्त झाल्या होत्या.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते तर...
२०२२ मध्ये राजकीय भूकंप झाला. शिवसेनेचे ४० आणि अपक्ष १० असे ५० आमदार घेऊन एकनाथ शिंदे बाहेर पडले आणि भाजपच्या मदतीने मुख्यमंत्री झाले. उद्धव यांनी मुख्यमंत्रिपद घेतलेच नसते तर शिवसेनेत बंड झालेच नसते, असा एक तर्क दिला गेला. १९९५ मध्ये शिवसेना-भाजपची सत्ता आली तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी आधी मनोहर जोशी आणि नंतर नारायण राणेंना मुख्यमंत्री केले व स्वत: सत्तेबाहेरच राहिले; पण, नियंत्रण त्यांचेच होते. गेल्या आठ वर्षांत बरेच पाणी वाहून गेले. २०२४ मध्ये आदित्य पुन्हा विधानसभेवर निवडून गेले. उद्धव हे विधान परिषदेचे सदस्य होतेच; पण, यावेळी ते पुन्हा विधान परिषदेवर जातील की बाळासाहेबांच्या ‘रिमोट कंट्रोल’ मार्गाने जातील, याविषयी प्रचंड उत्सुकता होती. आता त्यांनी बाळासाहेबांचा मार्ग निवडला आहे, आपल्या वडिलांसारखे आपल्या पक्षाला ते गतवैभव मिळवून देतील का, हे पाहणे आता महत्त्वाचे असेल.