मुंबई - काँग्रेसच खऱ्या अर्थाने राष्ट्रद्रोही आणि देशद्रोही असल्याचा घणाघात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करत काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करत शिंदे म्हणाले, “देशासाठी अहोरात्र झटणाऱ्या नेतृत्वाला लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान आहे.”
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी नरेंद्र मोदींवर टीका करताना त्यांचा उल्लेख दहशतवादी असा केला होता. त्यावरून आता एकनाथ शिंदे यांनी खर्गेंवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “देशाला प्रगतीपथावर नेणारे, भारताला आर्थिक महासत्तेकडे नेण्याचा ध्यास घेतलेले मोदी दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. त्यांनी आपल्या कार्यकाळात एकही दिवस सुट्टी घेतलेली नाही. ‘देश प्रथम’ हीच त्यांची भूमिका आहे. अशा नेतृत्वावर अश्लाघ्य आरोप करणे ही काँग्रेसची खालची पातळी दाखवते,” असे ते म्हणाले.
काँग्रेसवर निशाणा साधताना शिंदे पुढे म्हणाले, “ऑपरेशन सिंदूरच्या काळातही काँग्रेसने पाकिस्तानची भाषा बोलत भारतीय जवानांच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. हे अत्यंत लाजिरवाणे आहे. पंतप्रधानांनी ठोस कारवाई करून देशाच्या सन्मानासाठी उभे राहत शत्रूंना प्रत्युत्तर दिले, पण काँग्रेसला तेही पचले नाही.”
महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या नारीशक्ती वंदन विधेयकाला काँग्रेसने पाठिंबा न देता ते अडवण्याचा प्रयत्न केला, अशी जोरदार टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. “१४० कोटी जनतेच्या अपेक्षांवर पाणी फेरत काँग्रेसने महिलांच्या हक्कांनाच विरोध केला आहे. त्यामुळे देशातील महिला वर्गात काँग्रेसविरोधात तीव्र संताप निर्माण झाला असून, आगामी काळात महिलाच काँग्रेसला धडा शिकवतील,” असा घणाघात त्यांनी केला.
“महिलांच्या सन्मानासाठी आणि देशाच्या सुरक्षेसाठी निर्णायक भूमिका घेणाऱ्या नेतृत्वावर टीका करणे म्हणजे देशद्रोहाच्या जवळ जाणारे वक्तव्य आहे. काँग्रेसचे नेते सातत्याने देशविरोधी सूर लावतात. त्यामुळे तेच खरे राष्ट्रद्रोही असल्याचे जनतेसमोर उघड होत आहे,” असा घणाघातही शिंदे यांनी केला.काँग्रेसच्या राजकीय भविष्यावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
“अशा संतापजनक वक्तव्यांमुळे काँग्रेस स्वतःचीच कबर खोदत आहे. १४० कोटी जनता मोदींच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. आगामी काळात विशेषतः महिला वर्ग काँग्रेसला धडा शिकवेल,” असा इशाराही त्यांनी दिला.
“परदेशात जाऊन देशाची बदनामी करणे, पाकिस्तानची भाषा बोलणे आणि राष्ट्रीय हिताला धक्का पोहोचवणे हे काँग्रेसचे खरे चेहरे आहे,” असा आरोप करत शिंदे यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला.
Web Summary : Eknath Shinde strongly criticized Kharge's remarks against Modi, calling it an insult to 1.4 billion Indians. He accused Congress of echoing Pakistan's views and obstructing women's rights. Shinde asserted such actions are anti-national, leading Congress to its downfall.
Web Summary : एकनाथ शिंदे ने खड़गे की मोदी पर टिप्पणी की कड़ी आलोचना करते हुए इसे 1.4 अरब भारतीयों का अपमान बताया। उन्होंने कांग्रेस पर पाकिस्तान के विचारों को दोहराने और महिलाओं के अधिकारों में बाधा डालने का आरोप लगाया। शिंदे ने कहा कि ऐसे कार्य राष्ट्रविरोधी हैं, जिससे कांग्रेस का पतन हो रहा है।