यंदाच्या आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात सनरायझर्स हैदराबादच्या संघाने ईशान किशनच्या नेतृत्वाखाली सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. तसेच गेल्या तीन सामन्यात विजय मिळवत हैदराबादने गुणतक्त्यात चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. मात्र असं असलं तरी आता स्पर्धेच्या मध्यावरच ईशान किशनकडून कर्णधारपद काढून घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तसेच हैदराबादचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स पुन्हा एकदा संघात परतल्याने आता संघाचं नेतृत्व त्याच्याकडे सोपवण्यात येण्याची शक्यता आहे. पॅट कमिन्स हा आयपीएलच्या सुरुवातीच्या टप्प्यात उपलब्ध नसल्याने ईशान किशनकडे हैदराबादचं नेतृत्व सोपवण्यात आलं होतं.
ईशान किशनने यंदाच्या आयपीएलमध्ये हैदराबादचं नेतृत्व करताना संघाला सुरुवातीच्या पराभवांमधून सावरले. तसेच मागच्या सलग तीन सामन्यांमध्ये विजय मिळवून दिली. किशनच्या नेतृत्वाखालील हैदराबादच्या संघाच्या गोलंदाजीत कमालीची सुधारणा दिसून आली. सोबतच किशनने स्वत:ही फलंदाजीत चमक दाखवली. नेतृत्वातील सहजता आणि खेळाडूंसोबतचा उत्तम ताळमेळ यामुळे ईशानने हैदराबादच्या संघात बऱ्यापैकी स्थैर्य आणले आहे.
मात्र आता नियमित कर्णधार पॅट कमिन्स हा तंदुरुस्त होऊन हैदराबादच्या संघात परतण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे आता आपल्या नियमित आणि अनुभवी कर्णधाराकडे नेतृत्व सोपवायचं की, हंगामी कर्णधार म्हणून छाप पाडणाऱ्या ईशान किशनच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन त्याला कर्णधारपदी कायम ठेवायचं हा प्रश्न हैदराबादच्या संघव्यवस्थापनासमोर आहे. तसेच याचा निर्णय घेणं सोपं नसेल कारण याचा सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम संघाच्या पुढील कामगिरीवर होऊ शकतो.