CoronaVirus: Two deaths today in Maharashtra; patient toll crossed 200 hrb | CoronaVirus: राज्यभरात आज दोघांचा मृत्यू; कोरोनाग्रस्तांचा आकडा २०० पार

CoronaVirus: राज्यभरात आज दोघांचा मृत्यू; कोरोनाग्रस्तांचा आकडा २०० पार

मुंबई : राज्यभरात आज दोन कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला असून कोरोनाग्रस्तांचा आकडा २०० पार गेला आहे. तर ३५ रुग्णांना बरे करून घरी सोडण्यात आले आहे. 


राज्यभरात एकीकडे दिलासादायक आकडेवारी आलेली असताना दुसरीकडे दिवसभरात २२ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील एकूण रुग्ण संख्या २०३ वर गेली आहे. या नवीन रुग्णांमध्ये सर्वाधिक १० रुग्ण मुंबईचे आहेत तर ५ रुग्ण पुण्याचे, ३ नागपूरचे, २ अहमदनगरचे तर सांगली, बुलढाणा आणि जळगाव येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे. दरम्यान, कोरोना आजारातून बरे झालेल्या एकूण ३५ रुग्णांना आतापर्यंत घरी सोडण्यात आले आहे. 


आज राज्यात २ करोना बाधित रुग्णांचे मृत्यू झाले. एका ४० वर्षीय महिलेचा काल के ई एम रुग्णालयात तीव्र श्वसनावरोधामुळे मृत्यू झाला होता. ती करोना बाधित असल्याचे आज स्पष्ट झाले. तिला उच्च रक्तदाबही होता. बुलढाणा येथे एका ४५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू करोना मुळे झाला तो मधुमेही होता. राज्यातील करोना बाधित मृत्यूची संख्या आता आठ झाली आहे. 


राज्यात आज एकूण ३९४ जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत. १८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत ४२१० जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी ३४५३ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर २०३ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ३५ करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात १७,१५१  व्यक्ती घरी विलगीकरणात असून ९६० जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.

Web Title: CoronaVirus: Two deaths today in Maharashtra; patient toll crossed 200 hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.