राज्यात आजपासून आठवड्यातील चार दिवस कोरोना लसीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2021 07:21 AM2021-01-19T07:21:27+5:302021-01-19T07:22:25+5:30

‘वर्षा’ येथील समिती कक्षातून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधत लसीकरणाच्या तयारीचा आढावा घेतला.

Corona vaccination four days a week from today in the state | राज्यात आजपासून आठवड्यातील चार दिवस कोरोना लसीकरण

राज्यात आजपासून आठवड्यातील चार दिवस कोरोना लसीकरण

Next

मुंबई : राज्यात मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवारी होणाऱ्या कोरोना लसीकरणाच्या तयारीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आढावा घेतला. आठवड्यातील चार दिवस राज्यातील २८५ केंद्रांवर लसीकरण होणार असून ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबवून आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

‘वर्षा’ येथील समिती कक्षातून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधत लसीकरणाच्या तयारीचा आढावा घेतला. शनिवारी राज्यात लसीकरण मोहीम यशस्वीरीत्या राबविल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी यंत्रणेचे कौतुक केले. बैठकीस मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने आदी उपस्थित होते.

लसीकरणाच्या नोंदणीसाठी असलेल्या कोविन ॲपबद्दल मुख्यमंत्र्यांनी यावेळी माहिती घेतली. या ॲपची कार्यपद्धती अधिक गतिमान होण्याकरिता काही जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना केल्या. त्या केंद्र शासनाला पाठविण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

या दरम्यान एखाद्याला लस घेतल्यानंतर ताप, स्नायूदुखी यासारखे प्रतिकूल परिणाम जाणवल्यास त्यांना योग्य ते मार्गदर्शन आणि उपचार करा. गंभीर लक्षणे आढळल्यास त्यांची जास्त काळजी घ्या, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस टोचून घ्यावी. जेणेकरून समाजामध्ये सकारात्मक संदेश जाण्यास मदत होईल. त्यामुळे लसीकरणाची मोहीम अधिक प्रभावीपणे राबवावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

‘नियमांचे पालन करा’
कोविन ॲपवर ज्यांची नोंदणी होईल त्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करावे. लसीकरणामध्ये दोन डोस घेतल्यानंतर १४ दिवसांनी रोगप्रतिकारक क्षमता तयार होते. त्यामुळे लसीकरणानंतरही कोरोना प्रतिबंधासाठी जे नियम आहेत त्याचे सर्वांनी पालन करणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.  
 

Web Title: Corona vaccination four days a week from today in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.