‘राज्यात संभ्रमावस्था, कोण कुणासोबत हेच कळत नाही’, निरोपाच्या भाषणात उद्धव ठाकरेंनी लगावला टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 19:53 IST2026-03-24T19:52:36+5:302026-03-24T19:53:01+5:30
Uddhav Thackeray: निरोपाचं भाषण करताना उद्धव ठाकरे यांनी सर्वांचे आभार मानतानाच राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून टोला लगावला. राज्यामध्ये सध्या संभ्रमावस्था आहे. तसेच कोण कुणासोबत आहे, हेच कळत नाही आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले.

‘राज्यात संभ्रमावस्था, कोण कुणासोबत हेच कळत नाही’, निरोपाच्या भाषणात उद्धव ठाकरेंनी लगावला टोला
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा विधान परिषद सदस्य म्हणून विधान परिषदेतील कामकाजाचा आज शेवटचा दिवस होता. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर निरोपाचं भाषण करताना उद्धव ठाकरे यांनी सर्वांचे आभार मानतानाच राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून टोला लगावला. राज्यामध्ये सध्या संभ्रमावस्था आहे. तसेच कोण कुणासोबत आहे, हेच कळत नाही आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले.
आपल्या निरोपाच्या भाषणात विंदा करंदीकर यांच्या कवितेचा उल्लेख करत उद्धव ठाकरे म्हणाले की, केले कुणासवे किती हे कधी मोजू नये होणार त्याची विस्मृती त्याला तयारी पाहिजे, जो अनुभव मी घेत आहे. डोक्यावरी जे घेऊनी आज येथे नाचती घेतील ते पायतळी त्याला तयारी पाहिजे, हे सगळं आयुष्य आहे. जे डोक्यावर घेऊन नाचतात, असं सूचक विधान उद्धव ठाकरे यांनी केलं.
"आज २४ मार्च आहे. सहा वर्षांपूर्वी याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात लॉकडाऊन जाहीर केला होता. मुख्यमंत्री म्हणून माझ्या कामाची खरी सुरुवात त्याच दिवसापासून झाली. तो काळ अत्यंत विचित्र आणि आव्हानात्मक होता. आज त्याच तारखेला मी या सभागृहाचा निरोप घेतोय, हा एक विलक्षण योगायोग आहे., असेही उद्धव ठाकरे यांनी आपल्या निरोपाच्या भाषणात नमूद केले.