“शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार, पण आज थेट मदतीची जास्त गरज”: CM देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 16:18 IST2025-10-07T16:16:42+5:302025-10-07T16:18:05+5:30
CM Devendra Fadnavis PC News: उद्धव ठाकरेंचे सरकार असताना काय झाले, याची आकडेवारीच मांडत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर स्पष्ट भाष्य केले.

“शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार, पण आज थेट मदतीची जास्त गरज”: CM देवेंद्र फडणवीस
CM Devendra Fadnavis PC News: शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भात जे आश्वासन आमच्या सरकारने दिले आहे, ते आम्ही पूर्ण करणारच आहोत. पण आमचे माननीय उद्धव ठाकरे हे नेहमी त्यांनी कर्जमाफी केली, असे सांगत असतात. म्हणून आपल्या फक्त नजरेस आणून देतो की, महात्मा ज्योतिबा फुले ही कर्जमाफी योजना त्यांनी घोषित केली होती. त्यावेळी त्यांनी २० हजार ५०० कोटी रुपयांची कर्जमाफी केली होती. त्याच्या तीन वर्ष आधी आमच्याही सरकारने मी मुख्यमंत्री असताना आम्ही छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आणली होती. त्यात १८ हजार ७६२ कोटी सुरुवातीला आणि नंतर १९०० कोटी अशी एकूण २० हजार ५०० कोटी रुपयांची कर्जमाफी तेव्हाही आम्ही केली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी काही वेगळे केले, असे काही नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत बोलत होते. शेतकऱ्यांचे आपल्या पिकावर पोटच्या पोराप्रमाणे प्रेम असते. अशा स्थितीत पीक करपून गेले, पाण्याखाली गेले, जमीन खरडून गेल्याने पुन्हा पेरणीची स्थितीही उरली नाही. आर्थिक आणि मानसिक त्रास शेतकऱ्यांना झाला. त्याची शंभर टक्के भरपाई कुणीच देऊ शकत नाही परंतु शेतकरी पुन्हा उभा राहिला पाहिजे यासाठी पॅकेज तयार केले आहे. ६८ लाख ६९ हजार हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले. २९ जिल्हे आणि २५३ तालुके सरसकट मदतीच्या पॅकेजमध्ये घेतले आहेत. जिथे पिकांचे नुकसान झाले तिथे अटी शिथिल करून मदत केली जाणार आहे. राज्य सरकारने पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींची मदत जाहीर केली आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांना शेतकरी कर्जमाफीबाबत प्रश्न विचारण्यात आला.
शेतकऱ्यांना आज थेट मदतीची जास्त गरज
याउलट उद्धव ठाकरे यांनी नियमित कर्ज फेडणाऱ्यांना ५० हजार रुपये देण्याचे कबूल केले होते. परंतु, त्या अडीच वर्षांत उद्धव ठाकरेंनी फुटकी कवडी दिली नाही. ती सगळी ज्या वेळेस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, तेव्हा आम्ही ५ हजार कोटी रुपये हे त्यावेळेस दिले. मी हा आकडा याकरिता सांगतो की, आपण एक लक्षात ठेवा, २० हजार कोटी रुपयांची त्यांनी कर्जमाफी केली. आम्ही तर आत्ता जी नुकसानभरपाई देत आहोत, ती १८ हजार कोटी आहे. खरडून गेलेल्या जमिनींचा आकडा धरला तर तो २१ हजार कोटींच्या घरात जातो. त्यामुळे आम्ही कुठेही आमच्या घोषणेपासून दूर गेलेलो नाही. पण आज कर्जमाफी करण्यापेक्षा थेट मदत करणे जास्त महत्त्वाचे आहे. कारण आत्ता कर्जमाफी केली, तरी तो आपल्या जमिनीसाठी माती कुठून आणणार? पुढील हंगामासाठी पैसे कुठून आणणार? म्हणून आम्ही कर्जमाफीच्या संदर्भात कुठेही मागे हटलेलो नाही. तीही आम्ही करू. परंतु आज थेट मदत करणे, हे गरजेचे आहे. ती थेट मदत आम्ही राज्य सरकारच्या वतीने करत आहोत, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आम्ही तिघांनी बसून या पॅकेजवर चर्चा केली. शेतकऱ्यांवर अभूतपूर्व संकट असल्याने इतर ठिकाणचे चार पैसे कमी केली तरी शेतकऱ्यांना पैसे द्यायचे आहेत. कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मुलाचे शिक्षण बाधित होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यासाठी सीएसआर फंड काही जण द्यायला तयार आहेत. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पैसे दिले जातील. अजूनही काही मदतीची गरज असेल तिथे मदत करण्याची तयारी शासनाची आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.