सोहराबुद्दीन एन्काउंटर प्रकरणी अमित शहांना क्लीन चीट

By Admin | Updated: December 30, 2014 14:22 IST2014-12-30T13:42:34+5:302014-12-30T14:22:44+5:30

गुजरातमधील बहुचर्चित सोहराबुद्दीन शेखच्या एन्काउंटर प्रकरणी विशेष सीबीआय कोर्टाने भाजपाध्यक्ष अमित शहा यांना क्लीन चीट दिली आहे.

Amit Shah's clean chit in Sohrabuddin encounter case | सोहराबुद्दीन एन्काउंटर प्रकरणी अमित शहांना क्लीन चीट

सोहराबुद्दीन एन्काउंटर प्रकरणी अमित शहांना क्लीन चीट

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ३० - गुजरातमधील बहुचर्चित सोहराबुद्दीन शेख तसेच प्रजापती यांच्या एन्काउंटर प्रकरणी भाजपाध्यक्ष अमित शहा यांना क्लीन चीट दिल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान विशेष सीबीआय कोर्टाने शहा यांच्यावरील आरोप मागे घेत त्यांना क्लीन चीट दिली. 
गुजरात येथे २००५ मध्ये हा एन्काउंटर झाला, त्यानंतर या एन्काउंटरचा प्रमुख साक्षीदार तुलसीराम प्रजापती याचाही एन्काउंटर झाला़. त्यात अमित शहा व गुजरात पोलीस दलातील अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचा ठपका ठेवत सीबीआयने याचे आरोपपत्रही दाखल केले़ सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा खटला सुनावणीसाठी मुंबईत वर्ग करण्यात आल होता. विशेष न्यायालयात याची सुनावणी सुरू असताना या प्रकरणातून दोषमुक्त करण्याचा अर्ज शहा यांनी केला होता.  मी गुजरातचा गृहमंत्री असताना नागरिकांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी माझी होती,  त्या हेतूने मी सतत पोलिसांच्या संपर्कात असायचो़ मात्र या एन्काउंटरशी माझा काहीही संबंध नाही. राजकीय वैमनस्यातून मला या प्रकरणात गोवण्यात आले आहे. तेव्हा या प्रकरणातून मला दोषमुक्त करा, अशी विनंती शहा यांनी अर्जात केली होती. मात्र सोहराबुद्दीन याचा भाऊ रूबाबुद्दीन याने अर्ज करून शहा यांच्या विनंतीला विरोध केला होता. 
अखेर आज न्यायालयाने शहा यांच्यावरील आरोप मागे घेत त्यांना क्लीन चीट देत असल्याचा निर्णय जाहीर केला. 
दरम्यान केंद्र सरकारच्या हस्तक्षेपामुळे शहा यांना क्लीन चीट मिळाली असून न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात आम्ही उच्च न्यायालयात अपील करू, असे सोहराबुद्दीन यांचा भाऊ रुबाबुद्दीन यांनी म्हटले आहे.

Web Title: Amit Shah's clean chit in Sohrabuddin encounter case