तुरीच्या नुकसानभरपाई पोटी पीक विम्याची २५ टक्के अग्रिम रक्कम मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:59 IST2021-01-08T04:59:12+5:302021-01-08T04:59:12+5:30

यावर्षी खरिपाची पिके अवेळी पडलेल्या पावसामुळे व अतिवृष्टीने वाहून गेली. या नुकसानीतून उभारी न घेतलेल्या शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आशेपोटी ...

You will get 25 per cent advance of crop insurance to compensate for the loss | तुरीच्या नुकसानभरपाई पोटी पीक विम्याची २५ टक्के अग्रिम रक्कम मिळणार

तुरीच्या नुकसानभरपाई पोटी पीक विम्याची २५ टक्के अग्रिम रक्कम मिळणार

यावर्षी खरिपाची पिके अवेळी पडलेल्या पावसामुळे व अतिवृष्टीने वाहून गेली. या नुकसानीतून उभारी न घेतलेल्या शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आशेपोटी रबी पिकाची पेरणी केली होती. यामध्ये तुरीची पेरणी जिल्ह्यातील ८८ हजार ९२३ हेक्टर क्षेत्रावर झाली होती. मात्र, सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीला पुन्हा सामोरे जावे लागले. या अतिवृष्टीमुळे तुरीच्या पिकावर फायटोप्थोरा, करप्या, कुरडी, मळसड, आणि मर रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला होता. या रोगामुळे तुरीचे ८० टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे. त्यामुळेच या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून तूर उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी पीक विम्याची अग्रिम रक्कम देण्यात यावी, अशी मागणी आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी १४ डिसेंबर रोजी शासन व प्रशासन यांच्याकडे केलेली होती. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी आ. निलंगेकरांनी पत्रव्यवहार केलेला होता.

विमा कंपनीला प्रशासनाचे आदेश

आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलेल्या या मागणीला यश मिळाले असून, तूर उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी पीक विम्याची २५ टक्के अग्रिम रक्कम देण्याचा आदेश भारतीय कृषी विमा कंपनीला प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी दिले आहे. आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलेल्या मागणीमुळे व त्यांच्या पाठपुराव्याने जिल्ह्यातील नुकसानग्रस्त तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Web Title: You will get 25 per cent advance of crop insurance to compensate for the loss