मोघा येथे पुलासाठी रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:46 IST2020-12-11T04:46:17+5:302020-12-11T04:46:17+5:30

मोघा : मोघा येथून सुरु असलेल्या रस्त्याच्या कामामुळे येथील शेतकऱ्यांना रस्ता ओलांडून शेताकडे जाण्यासाठी मोठी अडचण होणार आहे. ...

Stop the road for the bridge at Mogha | मोघा येथे पुलासाठी रास्ता रोको

मोघा येथे पुलासाठी रास्ता रोको

मोघा : मोघा येथून सुरु असलेल्या रस्त्याच्या कामामुळे येथील शेतकऱ्यांना रस्ता ओलांडून शेताकडे जाण्यासाठी मोठी अडचण होणार आहे. त्यामुळे या मार्गामुळे पूल तयार करण्यात यावा, या मागणीसाठी गुरुवारी गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.

उदगीर- हैदराबाद हा मार्ग मोघा गावाजवळून जातो. या मार्गाच्या पलिकडे रावणगाव, बेलसकरगा असून तेथील शिवरात मोघा येथील ७० टक्के शेतकऱ्यांच्या शेतजमिनी आहेत. त्यामुळे गावकऱ्यांना हा मार्ग ओलांडून पलिकडे जावे लागते. सध्याही या रस्त्यावरुन ये- जा करताना अपघात होत आहेत. आगामी काळात महामार्ग झाल्यानंतर अपघाताची आणखीन भीती वाढणार आहे. त्यामुळे या रस्त्याच्या खालील बाजूने पूल बांधल्यास गावकऱ्यांची सोय होणार आहे.

या मागणीसाठी ग्रामपंचायतीमार्फत २ डिसेंबर रोजी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. परंतु, प्रशासकीय स्तरावर कुठलीही हालचाल न झाल्यामुळे गुरुवारी आंदोलन करण्यात आले.

आंदोलन सुरु झाल्यानंतर प्रशासकीय स्तरावरुन हालचाली झाल्या आणि नांदेड येथील महामार्गच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन गावकऱ्यांची ही समस्या शासनाला कळविण्याची हमी दिली. त्यानंतर हे आंदोलन थांबविण्यात आले. आंदोलनात गावातील नागरिकांचा सहभाग होता. यावेळी देवणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कामटेवाड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

तीन तास गावकऱ्यांचे आंदोलन...

पुलाच्या मागणीसाठी मोघा येथील गावकऱ्यांनी गुरुवारी तीन तास आंदोलन केले. राष्ट्रीय महामार्गाचे उपविभागीय अधिकाऱ्यांच्या प्रतिनिधीस निवेदन देण्यात आले. ही मागणी तत्काळ पूर्ण करावी, अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.

***

Web Title: Stop the road for the bridge at Mogha