लातूर हादरलं! शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यावर वसतिगृहासमोरच चाकू हल्ला; एकाचा मृत्यू, ३ जखमी.
By राजकुमार जोंधळे | Updated: February 17, 2026 00:24 IST2026-02-17T00:22:23+5:302026-02-17T00:24:11+5:30
Latur Crime : पूरणमल लाहाेटी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पदविका अभ्यासक्रमात तिसऱ्या वर्षांत शिकणाऱ्या चार विद्यार्थ्यांवर साेमवारी सायंकाळी औसा राेडवर ...

लातूर हादरलं! शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यावर वसतिगृहासमोरच चाकू हल्ला; एकाचा मृत्यू, ३ जखमी.
Latur Crime : पूरणमल लाहाेटी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पदविका अभ्यासक्रमात तिसऱ्या वर्षांत शिकणाऱ्या चार विद्यार्थ्यांवर साेमवारी सायंकाळी औसा राेडवर वसतिगृहासमाेरच चाकू हल्ला झाला. त्यात एकजण जागीच ठार झाला असून, तिघा जखमींवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. मुख्य आरोपी महाविद्यालयाबाहेरचा असून, त्याच्यासोबतचे तीन आरोपी मात्र पॉलिटेक्निकचेच विद्यार्थी आहेत.
पाेलिसांनी सांगितले, लातूर शहरातील औसा राेडवर साेमवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास चार जणांनी २१ वर्षीय विक्रम नारायण पांचाळ या तरुणावर चाकूने हल्ला केला. त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे. घाबरलेल्या स्थितीत तरुणांनी हल्ला करणाऱ्यांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, समाेर येणाऱ्या तरुणांवरही शस्त्राने वार केले. त्यात अदित्य भारत साडे (वय २०), सुजल बलभीम रेड्डी (२०) व एका १७ वर्षीय मुलावर चाकूचे वार केल्यानंतर मारेकरी घटनास्थळावरून पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच अप्पर पाेलिस अधीक्षक मंगेश चव्हाण, उपविभागीय पाेलिस अधिकारी समीरसिंह साळवे, पाेलिस निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी घटनास्थळी भेट देत तपासाची चक्रे गतिमान केली.
तासाभरात आरोपी जेरबंद...
घटना समजल्यानंतर पोलिसांची पथके चारही दिशेने रवाना झाली. पार्श्वभूमी कळल्यानंतर पोलिस आरोपींपर्यंत तासाभरात पोहोचले. त्यात ताब्यात घेण्यात आलेले तिघेजण पॉलिटेक्निकचेच विद्यार्थी आहेत. तर ज्याने सर्वांवर सपासप चाकू फिरवला, तो बाहेरचा युवक असल्याचे पोलिसांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविला जाईल. - समीरसिंह साळवे, उपविभागीय पोलिस अधिकारी, लातूर
प्रकरण चाकूहल्ल्यापर्यंत कसे गेले?
शासकीय तंत्रनिकेतनमध्ये राज्यभरातील विविध जिल्ह्यांमधील विद्यार्थी आहेत. त्यांच्यात वेगवेगळ्या कारणाने गटबाजी असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले असून, काही दिवसांपूर्वी वसतिगृहात एक गाडी फोडली होती. त्याचा आळ आपल्यावर येईल आणि मारहाण होईल, या शंकेने त्याने बाहेरून एका युवकाला बोलावून घेतले. तो चाकू घेऊनच आला. सोबत आणखी दोघे विद्यार्थी असे एकूण चौघेजण घटनास्थळी होते. त्यातील बाहेरून आलेल्या युवकाने चाकूहल्ला केला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
विक्रमवर दुर्दैवी हल्ला...
वसतिगृहातील गटबाजी वा कोणत्याही प्रकरणाशी विक्रम पांचाळ याचा संबंध पोलिसांना आढळून आलेला नाही. विक्रमची चूक नसताना आरोपीने चौघांवर केलेल्या चाकूहल्ल्यात त्याला नाहक जीव गमवावा लागला. दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी समीरसिंह साळवे म्हणाले, प्रकरणाचा सखोल तपास करून आरोपींवर कठोर कारवाई होईल.