ब्लॅकस्पॉटवर पोलिसांची लक्षवेधी जनजागृती; अपघातग्रस्त कार हायवेवर टांगली, वेग झाला कमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 13:03 IST2026-05-04T12:50:01+5:302026-05-04T13:03:11+5:30
सावधान! अती वेग आणि सीटबेल्टचा अभाव ठरला जीवघेणा; पोलिसांनी थेट महामार्गावर अपघातग्रस्त कार टांगून दिला काळजाला भिडणारा संदेश.

ब्लॅकस्पॉटवर पोलिसांची लक्षवेधी जनजागृती; अपघातग्रस्त कार हायवेवर टांगली, वेग झाला कमी
-महेबूब बक्षी
औसा (जि. लातूर): वेग आणि वाहतूक नियमांच्या उल्लंघनामुळे होणारे भीषण अपघात रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या संकल्पनेतून औसा पोलिसांनी एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. ६ मार्च रोजी रात्री औसा-तुळजापूर महामार्गावर एका भरधाव बीएमडब्ल्यू कारचा भीषण अपघात होऊन चौघांचा जागीच मृत्यू झाला होता. या अपघातात सीटबेल्टचा वापर न केल्यामुळे चौघांना आपला जीव गमवावा लागला, हे तपासात समोर आले होते.
अपघाताची कार बनली 'इशारा'
हाच जीवघेणा निष्काळजीपणा वाहनधारकांच्या नजरेत भरण्यासाठी पोलिसांनी तीच अपघातग्रस्त कार चार लोखंडी खांबांच्या सहाय्याने महामार्गालगत हवेत टांगली आहे. शेजारीच लावलेल्या माहिती फलकावर "सीटबेल्ट नाही वापरला म्हणून चौघांचा जीव गेला" असा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे. हा दृश्यात्मक संदेश पाहून महामार्गावरून ये-जा करणारे वाहनधारक सावध होत असून अनेकांकडून वेगावर नियंत्रण मिळवले जात असल्याचे चित्र दिसत आहे.
लातूर पोलिसांची 'धाडसी' जनजागृती; अपघातग्रस्त BMW कार महामार्गावर हवेत टांगून दिला सीटबेल्टचा धडा. #latur#marathwada#accidentpic.twitter.com/vciVAmlrY7
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) May 4, 2026
ब्लॅकस्पॉटवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न
औसा एमआयडीसी ते वानवडा मोड हा भाग 'ब्लॅकस्पॉट' म्हणून ओळखला जातो, जिथे आतापर्यंत ५० पेक्षा अधिक जणांचा अपघातात मृत्यू झाला आहे. मात्र, पोलिसांच्या या नाविन्यपूर्ण जनजागृतीनंतर या भागातील अपघातांचे प्रमाण काही प्रमाणात घटले असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
अती वेग टाळा
"जीवन अनमोल आहे. एक छोटीशी चूक संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करू शकते. अती वेग टाळा आणि सीटबेल्टचा वापर करा. वाहतूक नियमांचे पालन करणे हीच काळाची गरज आहे."
— रेवन डमाले, पोलीस निरीक्षक, औसा.