औसा (जि. लातूर): जमिनीचा तुकडा आणि घराची वाटणीवरून सुरू असलेल्या वादाने एका कुटुंबाचा सुखी संसार उद्ध्वस्त झाला आहे. घराच्या वाटणीवरून झालेल्या वादात पोटच्या मुलाने पित्याच्या डोक्यात काठीने प्रहार केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ६५ वर्षीय वृद्ध पित्याचा उपचारादरम्यान शनिवारी मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना औसा तालुक्यातील हिप्परगा येथे घडली असून, पोलिसांनी आरोपी मुलाला बेड्या ठोकल्या आहेत. भिवा बापू कांबळे असे मयत पित्याचे नाव आहे.
पाेलिसांनी सांगितले, मयत भिवा बापू कांबळे (वय ६५, रा. हिप्परगा) आणि मुलगा योगेश कांबळे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून घराच्या वाटणीवरून सातत्याने खटके उडत होते. १७ एप्रिल रोजी रात्री ९:१५ च्या सुमारास याच कारणावरून पुन्हा वादाला तोंड फुटले. बाप-लेकातील संवाद टोकाला गेला अन् रागाच्या भरात भिवा कांबळे यांनी मुलगा योगेशच्या पाठीत काठी मारली. पित्याने मारल्याचा राग अनावर झाल्याने योगेशने वडिलांच्या हातातील काठी हिसकावून घेतली आणि ‘तुम्ही मला काठी का मारली?’ असा जाब विचारत त्यांच्याच डोक्यात जोरात प्रहार केला. या हल्ल्यामध्ये भिवा कांबळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठा रक्तस्त्राव झाला.
आठ दिवसांची झुंज ठरली अपयशी
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वडिलांना ग्रामस्थांनी तातडीने लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर गेल्या आठ दिवसांपासून अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, शनिवारी दुपारी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
भावानेच दिली भावाविरुद्ध फिर्याद
विशेष म्हणजे, मयत भिवा कांबळे यांची मुलगी मुंबई पोलीस दलात कार्यरत आहे. रक्ताच्या नात्यापेक्षा कर्तव्याला आणि न्यायाला प्राधान्य देत, आपल्या वडिलांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या भावाला शिक्षा व्हावी, या भूमिकेतून त्यांनी मोठ्या भावाला लहान भावाविरुद्ध फिर्याद देण्यास प्रवृत्त केले.
अन् आरोपी मुलगा पोलिसांच्या जाळ्यात
या प्रकरणी भादा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी मुलगा योगेश कांबळे याला अटक केली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक महावीर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार पुरी हे करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
Web Summary : A land dispute in Latur's Hipparga turned fatal when a son fatally struck his 65-year-old father with a stick after an argument over property division. The son has been arrested; police are investigating.
Web Summary : लातूर के हिप्परगा में ज़मीनी विवाद में बेटे ने संपत्ति के बंटवारे को लेकर बहस के बाद अपने 65 वर्षीय पिता को डंडे से मार डाला। बेटे को गिरफ्तार कर लिया गया है; पुलिस जांच कर रही है।