‘हीट स्ट्रोक’चा मुक्या जनावरांनाही फटका; लातूर जिल्ह्यात लाखमोलाची बैलजोडी दगावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 17:46 IST2026-05-02T17:45:15+5:302026-05-02T17:46:46+5:30

निलंगा तालुक्यातील सावरी येथील घटना; तापमानाचा पारा ४३ अंशांंवर

'Heat stroke' affects even animals; A pair of bulls worth lakhs die in Latur district | ‘हीट स्ट्रोक’चा मुक्या जनावरांनाही फटका; लातूर जिल्ह्यात लाखमोलाची बैलजोडी दगावली

‘हीट स्ट्रोक’चा मुक्या जनावरांनाही फटका; लातूर जिल्ह्यात लाखमोलाची बैलजोडी दगावली

औराद शहाजानी (जि. लातूर) : दिवसेंदिवस सूर्य आग ओकत असून, औराद शहाजानी परिसरातील तापमान ४३ अंशांच्या पुढे गेले आहे. या रणरणत्या उन्हाचा फटका केवळ मानवालाच नाही, तर मुक्या जनावरांनाही बसत आहे. निलंगा तालुक्यातील सावरी येथे शेतात बांधलेल्या बैलजोडीचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली.

सावरी येथील शेतकरी मदन भंडारे यांनी बुधवारी सकाळी आणि सायंकाळच्या वेळी बैलजोडीच्या मदतीने शेताची मशागत केली होती. दुपारी बैलांना झाडाखाली सावलीत बांधले होते. सायंकाळी मेहनत केल्यानंतर बैलांना पाणी पाजून ते घराकडे गेले. रात्री नऊच्या सुमारास पुन्हा शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले असता, त्यांना एक बैल जमिनीवर कोसळलेला दिसला, तर दुसऱ्या बैलाच्या तोंडातून विचित्र आवाज येत होता. भंडारे यांनी तात्काळ पशुवैद्यकीय डॉक्टरांना पाचारण केले, मात्र डॉक्टर येण्यापूर्वीच दुसऱ्या बैलानेही त्यांच्या डोळ्यादेखत प्राण सोडला.

गुरुवारी सकाळी निलंगा तहसील प्रशासनाच्या वतीने तलाठी बालासाहेब मोहळकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. औराद शहाजानी येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रश्मी ठाकूर यांनी पथकासह बैलांचे शवविच्छेदन केले. त्यांच्या अहवालानुसार, अति उष्णतेमुळे बैलांच्या शरीरातील पाणी कमी होऊन आणि ‘हीट स्ट्रोक’ बसल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. शेतीची कामे तोंडावर असताना दीड लाखाची जोडी गेल्याने आता शेती कशी करायची? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे.

तापमानाचा लपंडाव आणि रात्रीची उष्णता
सध्या कमाल तापमान ४३ अंश असले तरी किमान तापमानही ३२ अंशांवर पोहोचले आहे. रात्री १२ वाजेपर्यंत जमिनीतून गरम वाफा बाहेर येत असल्याने जनावरांना श्वसनाचा त्रास होत आहे. या भीषण उष्णतेमुळे आतापर्यंत परिसरात दोन नागरिकांचे बळी गेले असतानाच, आता मुक्या जनावरांच्या मृत्यूने शेतकरी, पशुपालकांची धास्ती वाढली आहे.

दिवसा तसेच रात्रीही जनावरांची काळजी घ्या
सध्या तापमानाचा पारा अधिकच वाढलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःची काळजी घेण्यासोबतच जनावरांची काळजी घ्यावी. सकाळी १० ते ५ या वेळेत उन्हात जनावरे बांधू नयेत, जनावरांना पुरेशी सावलीची व्यवस्था करावी. दिवसातून किमान तीनवेळा ताजे पाणी पाजावे, असे निलंग्याचे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितले.

Web Title : लू से पशुधन की मौत: लातूर में किसान ने मूल्यवान बैल खोए

Web Summary : लातूर में भीषण गर्मी के कारण एक किसान ने लू लगने से अपनी बैलों की जोड़ी खो दी। छाया और पानी देने के प्रयासों के बावजूद जानवरों की मौत हो गई। पशु चिकित्सा रिपोर्टों ने गर्मी को कारण बताया। यह घटना जानवरों पर लू के गंभीर प्रभाव को उजागर करती है।

Web Title : Heatwave Kills Livestock: Farmer Loses Valuable Bulls in Latur

Web Summary : A Latur farmer lost his prized bullock pair to heatstroke amidst scorching temperatures. The animals succumbed despite efforts to provide shade and water. Veterinary reports confirmed heat as the cause. The incident highlights the severe impact of the heatwave on animals.