यंदाचे ‘कुसुम’ पारितोषिक पुण्याच्या अपर्णा देशमुख यांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:26 IST2021-02-09T04:26:46+5:302021-02-09T04:26:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कसदार सामाजिक कार्याबद्दल दिले जाणारे ‘कुसुम’ पारितोषिक यंदा पुण्याच्या डॉ. अपर्णा देशमुख यांना सोमवारी ...

This year's 'Kusum' award goes to Aparna Deshmukh of Pune | यंदाचे ‘कुसुम’ पारितोषिक पुण्याच्या अपर्णा देशमुख यांना

यंदाचे ‘कुसुम’ पारितोषिक पुण्याच्या अपर्णा देशमुख यांना

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कसदार सामाजिक कार्याबद्दल दिले जाणारे ‘कुसुम’ पारितोषिक यंदा पुण्याच्या डॉ. अपर्णा देशमुख यांना सोमवारी जाहीर करण्यात आले. ५१ हजार रुपये, शाल, बोधचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. त्याचे वितरण गुरुवारी (दि. ११ फेब्रुवारी) सायंकाळी ५ वाजता कोरगावकर हायस्कूलमध्ये होत आहे. ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांच्याहस्ते व आंतरभारती शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा सुचेता कोरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा होईल.

सुचेता कोरगावकर, तनुजा शिपूरकर, सुचिता पडळकर, पल्लवी कोरगावकर, विनय पाटगावकर यांच्या निवड समितीने ही निवड केली आहे. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक दिवंगत प्रा. चंद्रकांत पाटगावकर यांनी आयुष्यभर समतेचा विचार समाजामध्ये पोहोचवण्याचे कार्य केले. त्यांच्या मृत्युपश्चात त्यांच्या कुटुंबियांनी त्यांची शिल्लक रक्कम आंतरभारती शिक्षण मंडळाकडे सोपविली. त्यातून आयुष्यात वेगळी वाट चोखाळून समाजाच्या भल्यासाठी दोन पावले चालणाऱ्या कार्यकर्त्या महिलेसाठी ‘कुसुम’ पारितोषिक देण्यात येते.

यावर्षीच्या विजेत्या डॉ. अपर्णा देशमुख या वयाच्या ३७ व्या वर्षी सत्तर आजी-आजोबांच्या आई होऊन त्यांचा सांभाळ करत आहेत. समाजाला आजकाल स्वत:चेच आई, वडील नको झालेले असताना, देशमुख मात्र आईच्या ममतेने हे कार्य करत आहेत. गेल्या दहा वर्षांपासून संपूर्ण कुटुंबच झालेल्या आजी-आजोबांवर योग्य आणि हमखास उपचार व्हावेत म्हणून स्वतःचे रुग्णालय सुरू केले आहे. लग्न न करण्याचा निर्णय घेऊन, या आजी-आजोबांना ‘आभाळमाया’ नावाचे घर देण्यामध्ये त्या गुंतलेल्या आहेत. डॉ. देशमुख मूळच्या जळगावच्या. बी.ए.एम.एस. शिक्षणानंतर त्या पदव्युत्तर शिक्षणासाठी पुण्यात आल्या. एकेदिवशी काम संपवून त्या घरी जाताना, रस्त्याच्या कडेला फ्रॅक्चर झालेल्या अवस्थेत पडलेल्या आजी बघितल्या. त्या आजींना तशा अवस्थेत घरी आणले आणि त्यातूनच ‘आभाळमाया’ संस्थेचा जन्म झाला.

आतापर्यंतच्या मानकरी...

पुरस्काराचे हे सातवे वर्ष आहे. याअगोदर डॉ. कविता सातव, मुमताज शेख, कांचनताई परुळेकर, मेधा पुरव-सामंत, सुनीती सु. र., डॉ. सुचेता धामणे यांना गौरविण्यात आले आहे.

फोटो : ०८०२२०२१-कोल- अपर्णा देशमुख-पुरस्कार

Web Title: This year's 'Kusum' award goes to Aparna Deshmukh of Pune